मंगळावर राहायला मिळणार? नासाकडे करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:33 AM2021-08-13T06:33:32+5:302021-08-13T06:33:49+5:30
मंगळ ग्रहावर समानव अवकाश मोहीम काढता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने तशी तयारी चालवली आहे.
पत्रिकेत मंगळ असेल तर विवाह जुळण्यात अडचणी येतात, अशी आपल्याकडची धारणा. मात्र, लाल रंगाच्या या ग्रहाबद्दल अवकाश संशोधकांना प्रचंड आकर्षण आहे. मंगळ ग्रहावर समानव अवकाश मोहीम काढता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने तशी तयारी चालवली आहे.
हा सर्व जामानिमा का?
मंगळ ग्रहावर निवास करताना काय अडचणी येऊ शकतील आणि त्यावर मात कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व जामानिमा आहे.
मंगळाची वातावरणनिर्मिती असलेल्या या १७०० चौरस फुटांच्या डोममध्ये राहणाऱ्यांना सिम्युलेटेड स्पेसवॉक, शास्त्रीय संशोधन आणि आभासी वस्तुस्थिती व प्रत्यक्ष रोबोटिक नियंत्रण इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाईल.
मिशनचे उद्दिष्ट काय?
मंगळ ग्रहावरील प्रत्यक्ष मोहिमेतील संभाव्य अडचणींचा सखोल अभ्यास याद्वारे केला जाईल.
सर्व संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्यानुसार काम केले जाईल.
अर्ज कोण करू शकणार आहे?
या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा, असे नासाकडून सांगण्यात आले आहे.
अर्जदार अमेरिकी नागरिक असावा व त्याचे वय ३० ते ५५ या वयोगटातील असावे.
अर्जदाराने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील मास्टर्स डिग्री मिळवलेली असावी तसेच या क्षेत्रात काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव उमेदवाराला असावा.
मिशन नेमके आहे काय?
नासाने ने ‘मार्स ड्युन अल्फा’ हे एक प्रारूप तयार केले आहे.
या सिम्युलेटेड मॉड्युलमध्ये स्वयंपाकघर, वैद्यकीय उपचार, मनोरंजन, व्यायाम, कामकाज, पीकवृद्धी, तांत्रिक काम इत्यादींसाठी पुरेशी जागा आणि दोन स्नानगृहे इत्यादी सोयीसुविधा देण्यात येणार आहे.
या ठिकाणी वर्षभर राहण्यासाठी चार विद्यार्थ्यांची निवड होईल, त्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे.
नासातर्फे १७०० चौरस फूट आकाराचे मॉड्यूल तयार केले जाणार असून त्या ठिकाणी मंगळ ग्रहासारखे वातावरण करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षे हा उपक्रम सुरू राहणार आहे.