नासाचे सूर्याला गवसणी घालण्याचे एेतिहासिक 'उड्डाण' 24 तासांनी लांबले; तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:08 PM2018-08-11T12:08:40+5:302018-08-11T15:27:59+5:30
उड्डाणाची वेळ माेजणाऱ्या घड्याळामध्ये ऐनवेळी बिघाड
वॉशिंग्टन : चंद्र, मंगळावर स्वाऱ्या केल्यानंतर नासा ही संस्था आज दुपारी 1 वाजता अतिशय तप्त अशा सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी अंतराळ यान पाठविणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या क्षणाला हा निर्णय बदलण्यात आला. आता हे यान उद्या, रविवारी दुपारी पाठविणार आहे. नासाने 24 तासांनी यानाचे उड्डाण लांबणीवर टाकले.
सोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून ते सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे. रामायणकाळामध्ये मारुतीरायांनी लहान असताना फळासारखे लालबुंद दिसणाऱ्या सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे. हे यान एका कारच्या आकाराएवढे असून ते सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत सूर्याची उष्णता आणि प्रखर प्रकाशाचा कोणत्याही यानाने सामना केलेला नाही.
फ्लोरिडाच्या केप केनवेरल येथून आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी हे यान सूर्याकडे झेपावणार होते. परंतु, वेळ मोजणाऱ्या घडाळ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याने नासाने यानाचे उड्डाण 24 तासांनी लांबणीवर टाकले. नासाच्या तंत्रज्ञांकडे 65 मिनिटांचा कालावधी होता. मात्र, बिघाड दुरुस्त न झाल्याने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला.
या यानाला युनाटेड लाँच अलायन्सच्या डेल्टा 4 या रॉकेटद्वारे सोडण्यात येणार आहे. यानंतर पुढील काही महिन्यांतच हे यान सूर्याजवळ पोहोचेल. हे यान आतापर्यंतच्या माननिर्मित कोणत्याही यंत्रांपेक्षा सर्वात जवळ जाऊन निरीक्षण करणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कक्षेचे तापमान 300 पटींनी जास्त असते.
This morning's launch of a @ulalaunch#DeltaIV Heavy rocket carrying the #ParkerSolarProbe spacecraft was scrubbed. The launch is planned for Sunday, Aug. 12. Details: https://t.co/0BhSpVA9oZpic.twitter.com/QQWZv2gKo0
— NASA (@NASA) August 11, 2018
parker solar probe हे यान 2024 पर्यंत सात वेळा सूर्यप्रदक्षिणा घालणार आहे. प्रोब आपल्यासोबत अन्य उपकरणेही घेऊन जात आहे. याद्वारे सूर्याच्या बाहेरील वातावरणासोबत आतील स्फोटक वातावरणाचेही निरीक्षण करण्यात येणार आहे. या उपकरणांद्वारे नोंदवलेल्या माहितीवरून सूर्यासंबंधीच्या अनेक बाबींचे गुढ उकलण्यात मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
या यानाला उष्णतेपासून वाचविण्यासाठी केवळ साडे चार इंचाचे उष्णतारोधक आवरण वापरण्यात आले आहे.