'फाटलेली जीन्स घालणा-या तरुणींवर बलात्कार करणं राष्ट्रीय जबाबदारी', वादग्रस्त वक्तव्य करणा-या वकिलाला कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 10:07 AM2017-12-06T10:07:34+5:302017-12-06T10:11:56+5:30
वकील नबीह अल वाहश यांनी फाटलेली जीन्स घालणा-या तरुणींवर बलात्कार करणं राष्ट्रीय जबाबादारी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. न्यायालयाने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कैरो - मिस्त्रमधील एका वकिलाला वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच महागात पडलं आहे. वकील नबीह अल वाहश यांनी फाटलेली जीन्स घालणा-या तरुणींवर बलात्कार करणं राष्ट्रीय जबाबादारी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. न्यायालयाने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबत 72 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एका टीव्ही शोदरम्यान नबीह अल वाहश यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या टीव्ही शोमध्ये वेश्याव्यवसायावर चर्चा सुरु होता. वादग्रस्त वक्तव्य करताना नबीह अल वाहश बोलले होते की, 'मी म्हणतो जेव्हा एखादी तरुणी रस्त्यावरुन जात असते, तेव्हा तिचा लैंगिक छळ करणे आणि बलात्कार करणे राष्ट्रीय जबाबदारी आहे'. अल असीमा चॅनेलवर ही चर्चा सुरु होती. पुढे ते बोलले की, 'तुम्ही रस्त्यावरुन चालणा-या तरुणीकडे पाहून तुम्ही आनंदी होता का, जिची उघडी पाठ तुम्हाला दिसत आहे ? मी म्हणतो ती तरुणी अशाप्रकारे चालत असेल तर तिचा लैंगिक छळ करणे, तिचा बलात्कार करणे आपली राष्ट्रीय जबाबदारी ठरते'.
वकील महाशय एवढ्यावर थांबले नाहीत. पुढे त्यांनी सांगितलं की, 'ज्या महिला छोटे कपडे घालतात, त्या पुरुषांना त्यांचा छळ करण्यासाठी आमंत्रण देत असतात. अशा परिस्थितीत आपल्या सीमा ठरवण्यापेक्षा संस्कृतीचं रक्षण करणं जास्त महत्वाचं ठरतं'.
नबीह अल वाहश यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन मिस्त्रमध्ये प्रचंड वाद झाला आहे. येथील राष्ट्रीय महिला परिषदेने यासंबंधी टीव्ही चॅनेलच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे. याआधी त्यांनी नबीह अल वाहश आणि टीव्ही चॅनेलविरोधात अॅटर्नी जनरलकडे तक्रार करण्याची घोषणा केली होती. मिस्त्रमधील महिला आयोगाने टीव्ही चॅनेलवर अशी वादग्रस्त वक्तव्य केली जाऊ नयेत, त्यावर बंदी आणावी यासाटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.