जगभर निनादले भारतीय राष्ट्रगीत
By admin | Published: August 16, 2016 01:12 AM2016-08-16T01:12:11+5:302016-08-16T01:12:11+5:30
जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी
बीजिंग/ वॉशिंग्टन : जगाच्या कानाकोपऱ्यांतील भारतीयांनी सोमवारी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. चीन, अमेरिका, थायलंड आणि सिंगापूरमधील भारतीयांनी राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन आणि नृत्य सादर करून विविधतेत सामावलेल्या एकतेचे दर्शन घडविले.
चीनमध्ये भारतीय राजदूत विजय गोखले यांनी दूतावासाच्या आवारात राष्ट्रध्वज फडकावला. तेथील कर्मचाऱ्यांसह अन्य भारतीयही आपापल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमात सहभागी झाले. गोखले यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गीते सादर करण्यात आली.
शांघाय येथे भारतीय उच्चायुक्त प्रकाश गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखविले. अशाच स्वरूपाचा कार्यक्रम गाँगझो येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात झाला. उच्चायुक्त वाय. के. सैलास थांगल अध्यक्षस्थानी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी येथे भारताचा स्वातंत्र्य दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. हजारो भारतीयांनी त्यात सहभागी होत येथील विविधरंगी संस्कृतीचे दर्शन घडवले. डल्लास, ह्युस्टन, शिकागो, आॅरलँडो या शहरांतील भारतीयांच्या संघटनांनी शनिवारपासूनच विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
बँकॉक येथील भारतीय राजदूत भावंत सिंग बिश्णोई म्हणाले, ‘थायलंड हा पूर्वीपासूनच भारताचा अतिशय जवळचा मित्र देश आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने २०१६ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरले. व्यक्ती-व्यक्तींतील बंध हा या दोन देशांतील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. भारतीय समाजाची भूमिका या संबंधांच्या केंद्रस्थानी आहे. भारतीयांनी थायलंडच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे.’ या कार्यक्रमाला सुमारे ५०० भारतीय उपस्थित होते.
सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले.
तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार येथेही भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (वृत्तसंस्था)
- सिंगापूर येथे भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे ६०० भारतीय सहभागी झाले. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंह यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषण वाचून दाखविले. तेथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि नृत्ये सादर केली.