नाटो, अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

By admin | Published: December 30, 2014 02:05 AM2014-12-30T02:05:14+5:302014-12-30T02:05:14+5:30

अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटोचे सैन्य माघारी आल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेले १३ वर्षांचे युद्ध संपले आहे.

NATO, US military withdraws from Afghanistan | नाटो, अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

नाटो, अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

Next

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटोचे सैन्य माघारी आल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेले १३ वर्षांचे युद्ध संपले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढले गेलेले हे युद्ध संपल्याचे सांगण्यात येत असताना अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना मात्र बंडखोर तालिबान्यांशी लढावेच लागणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सैन्य माघारीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान ही ‘धोकादायक जागा’ असल्याचा इशाराही दिला आहे.
अफगाणिस्तानात नाटोने हे युद्ध १३ वर्षे लढले. त्याचा २८ डिसेंबर रोजी औपचारिक शेवट काबूलमध्ये ध्वज अर्ध्यावर घेऊन झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना स्वबळावर लढावे लागणार आहे. अमेरिकेत ९/११ चा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे सैन्य काबूलमध्ये दाखल झाले ते तालिबान्यांना सत्तेवरून हुसकावून लावण्यासाठी. या युद्धात अमेरिकेचे जवळपास २२०० सैनिक ठार झाले.
ओबामा यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,‘‘गणवेशातील आमच्या पुरुष आणि महिला सैनिकांच्या असाधारण त्यागाबद्दल आभार. आता, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेली अफगाणिस्तानातील आमची युद्ध मोहीम ‘विश्वासार्ह निष्कर्षाला’येऊन संपत आहे. या १३ वर्षांत अमेरिकेच्या सैन्याने अल कायदाच्या नेतृत्वाला उद्ध्वस्त केले व ओसामा बिन लादेनला न्याय दिला. दहशतवादी कट उधळून लावताना शेकडो अमेरिकनांचे जीव वाचविले.’’ सैन्याचे आणि गुप्तचरांचे आभार मानताना ओबामा म्हणाले,‘‘आम्ही सुरक्षित असून सैनिकांच्या सेवेमुळे आमचा देश अधिक सुरक्षित झाला आहे.’’
अफगाणिस्तानात धाडसी अमेरिकन सैनिक आणि मुत्सद्यांमुळे, तसेच नाटोचे मित्र आणि आघाडीतील भागीदार देश यांच्यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आता ते स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतील. त्यांनी ऐतिहासिक ठरलेली निवडणूक घेऊन ती पूर्ण केली. सत्तेचे पहिले लोकशाही मार्गांनी हस्तांतरण पूर्ण केले.’’
अफगाणिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून अमेरिका आणि आमचे मित्र देश व भागीदार मर्यादित स्वरूपात तेथे राहणार आहोत. अफगाणिस्तान सैन्याला प्रशिक्षण, सल्ला आम्ही देणार आहोत, असेही ओबामा म्हणाले. अफगाणिस्तानशी झालेल्या द्विपक्षीय करारानुसार १२,५०० विदेशी सैन्य अफगाणिस्तानात राहील. हे थेट लढणार नाही; परंतु तालिबानविरुद्ध अफगाणिस्तानचे सैन्य व पोलिसांना मदत करील. अफगाणिस्तानात तालिबान्यांचे १९९६ पासून २००१ पर्यंत राज्य होते. (वृत्तसंस्था)

४काबूल : अफगाणिस्तानात नाटो आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्य मोहीम अपयशी ठरली असून, या मोहिमेतील क्रूरतेमुळे देशाला रक्तपात बघावा लागला, असे तालिबानने म्हटले.
४अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेत असल्याची औपचारिक घोषणा रविवारी काबूलमध्ये गोपनीय कार्यक्रमात करण्यात आली. त्यानंतर सोमवारी तालिबानने इंग्रजी भाषेत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सैन्य मोहीम अपयशी ठरल्याचे म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानात १० हजार लोक ठार झाले. यातील ७५ टक्के लोक हे तालिबानच्या हल्ल्यांत मरण पावले.

Web Title: NATO, US military withdraws from Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.