नट्टापट्टा भोवला, जपानच्या महिला उद्योगमंत्र्याने दिला राजीनामा
By admin | Published: October 20, 2014 01:40 PM2014-10-20T13:40:35+5:302014-10-20T13:40:35+5:30
सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. २० - भारतात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याची घटना नवीन नसली तरी जपानमध्ये एका महिला मंत्रीला सरकारी पैशांमधून नट्टापट्टा करणे चांगलेच महागात पडले आहे. सरकारी तिजोरीतील ९४ हजार डॉलर्स सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केल्याच्या आरोपामुळे जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांना सोमवारी राजीनामा द्यावा लागला आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान दिले होते. जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याचे आबे यांचे प्रयत्न होते. मात्र सोमवारी आबे यांच्या मंत्रिमंडळातील दोन्ही महिला मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामे द्यावे लागले आहे. जपानच्या उद्योगमंत्री युको ओबूची यांनी सोमवारी सकाळी आबे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सर्वात महत्त्वाच्या खात्याच्या जबाबदारी असलेल्या ओबुची यांनी सरकारी पैशांचा गैरवापर करत त्यातून सौंदर्यप्रसाधन आणि अन्य कामासाठी खर्च केल्याचे समोर आले होते. विरोधकांकडून टीका सुरु झाल्यावर ओबुची यांनी सोमवारी राजीनामा दिली. ४० वर्षीय ओबुची यांची राजीनाम्याने आबे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ निवडणूक खर्चाचे उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे अन्य एका महिला मंत्र्यांनेही सोमवारी राजीनामा दिल्याने आबे सरकारला आणखी धक्का बसला आहे.