नवाज यांची गच्छंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:26 AM2017-07-29T05:26:58+5:302017-07-29T05:27:08+5:30
नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
इस्लामाबाद : नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले आहे. शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर कोण पंतप्रधान होणार, हे अद्याप ठरले नसून, तो बहुधा ३१ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.
नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांचे नाव सर्वात पुढे आहे. किंबहुना त्यांनी पंतप्रधान व्हावे, अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. ते सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत आणि नॅशनल असेंब्लीचे ते सदस्य नसल्याने त्यांना लगेचच पंतप्रधान होता येणार नाही. त्यामुळे शाहबाझ नॅशनल असेंब्लीवर निवडून येईपर्यंत नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्याकडे सूत्रे सोपवावीत, असा विचार पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षामध्ये सुरू आहे. त्यात पाकचे संरक्षणमंत्री, पेट्रोलियममंत्री, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष यांची नावे शर्यतीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.
नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.
त्या पथकाने १0 जुलै रोजी आपला अहवाल सादर केला, तेव्हाच नवाज
शरीफ यांच्यावर ठपका ठेवल्याचे समोर आले होते.
लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश
न्यायालयाचा निकाल शरीफ यांच्याविरोधात जाईल, याची कुणकुण पोलिसांनाही लागली होती. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाबाहेर खूपच मोठा बंदोबस्त लावला होता. हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तेथे होते. याशिवाय सुरक्षा दलाचे काही जवानही तेथे होते. देशात पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लष्करालाही देशभर सज्ज राहण्याचे आदेश लष्करप्रमुखांनी दिले असल्याचे वृत्त आहे.
नवाज शरीफ यांनी राजीनामा दिला
असला तरी, सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) हा पक्ष आपली मुदत पूर्ण करेल. आमचा पक्षच पूर्ण पाच वर्षे सत्तेत असेल व मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जाणार नाहीत, असे त्या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले.
न्यायालयाच्या आदेशाचे आणि शरीफ यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पाकिस्तानात पसरताच तेथील विरोधी पक्षांनी आणि विशेषत: इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी अनेक ठिकाणी मिठाईही वाटली.
‘शरीफ’ आहोत, हे सिद्ध करताना त्यांची तारांबळ उडणार
न्यायालयाने त्यांना पदावरून खाली उतरण्यास तर भाग पाडलेच, पण पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोमार्फत शरीफ व त्यांच्या कुटुंबीयांवर खटला भरण्याचेही आदेश दिले. त्यामुळे या खटल्यांनाही शरीफ कुटुंबीयांना सामोरे जावे लागणार आहे. आपण खरोखरच ‘शरीफ’ आहोत, हे सिद्ध करताना त्यांची तारांबळ उडणार आहे.