नवाज शरीफ यांचा PM होण्याचा मार्ग जवळपास मोकळा, बिलावल यांची शर्यतीतून माघार; आणखी एका उमेदवाराचा PTIला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:56 AM2024-02-14T02:56:43+5:302024-02-14T02:58:04+5:30
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे.
पाकिस्तानमध्ये पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा विक्रमी चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. खरे तर, पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. तसेच, नव्या सरकारचा भाग न होता, आपला पक्ष नवाज यांना पाठिंबा देईल, असे जाहीर केले आहे.
या निवडणूकीत सर्वाधिक जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यांतील अधिकांश उमेदवार हे पीटीआय पक्षाचे समर्थन असलेले होते. निवडणूक निकाल येऊन पाच दिवस उलटले आहेत. मात्र तरीही पुढचे सरकार कुणाचे होणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्या 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या तीन प्रमुख पक्षांपैकी कुणालाही पूर्ण बहुमत मिळालेले नाही. यामुळे कोणताही पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही. परिणामी येथे त्रिशंकू संसदेची स्थिती निर्माण झाली आहे.
बिलावल भुट्टो यांनी आज पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, खरे तर, आपल्या पक्षाला केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश नाही. या मुळे आपण स्वत:ला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पुढे करणार नाही. केंद्रात पीएमएल-एन आणि अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक आहे.
पीटीआय समर्थित आणखी एका सदस्याचा 'पीएमएल-एन'मध्ये प्रवेश -
दुसऱ्या बाजूला, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का बसला आहे, कारण त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेला आणखी एक अपक्ष उमेदवार पीएमएल-एनमध्ये सामील झाला आहे. नॅशनल असेंब्ली मतदारसंघ-54 मधून पीटीआय-समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले बॅरिस्टर अकील मलिक यांनी माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पीएमएल-एनमध्ये प्रवेश केला. अकील मलिक यांनी पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज यांची भेट घेतली. त्यांनी पक्षाचे सर्वोच्च नेते नवाझ शरीफ आणि शाहबाज शरीफ यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.