नवाझ शरीफांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष सुटका; पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 07:14 PM2023-12-12T19:14:55+5:302023-12-12T19:15:34+5:30
निर्दोष सुटका झाल्यामुळे नवाज शरीफ आगामी निवडणूक लढवू शकतात.
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. इस्लामाबाद हायकोर्टाने मंगळवारी नवाझ शरीफ यांची अल-अझिझिया प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्यास ते पंतप्रधानही होऊ शकतात.
तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांना डिसेंबर 2020 मध्ये गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. वैद्यकीय कारणास्तव नवाज यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आणि तेव्हापासून तिकडेच होते. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते पाकिस्तानात परतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांपैकी एक अल-अझिझिया खटला आहे, ज्यात नवाज शरीफ दोषी आढळले. त्यांना याप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 1.5 अब्ज पाकिस्तानी रुपये दंडही ठोठावण्यात आला होता. पण, आता त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.