नवाझ शरीफ यांनीही बोलावली सर्वपक्षीय बैठक
By Admin | Published: October 3, 2016 05:36 PM2016-10-03T17:36:01+5:302016-10-03T17:41:08+5:30
सोमवारी नवाझ शरीफ यांनी 'एककलमी अजेंडा'साठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी नवाझ शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इमरान खानपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.3 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पाकिस्तान एकीकडे नाकारत असताना, दुसरीकडे याच मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ बैठकांवर बैठक घेताना दिसत आहेत. सोमवारी नवाझ शरीफ यांनी 'एककलमी अजेंडा'साठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीसाठी नवाझ शरीफ यांचे राजकीय प्रतिस्पर्धी इमरान खानपासून ते बिलावल भुट्टोंपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आले होते.
या बैठकीत भारत आणि काश्मीर मुद्यावर आगामी रणनीती आखण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, युद्धासाठी उकसवणा-या भारताविरोधात आम्ही एकजूट आहोत, असा कांगावखोर पाकिस्तानच्या एका कॅबिनेट मंत्र्याने केला आहे. तर,'अनेक मुद्यांवर सरकारसोबत मतभेद असूनही, काश्मीर आणि नियंत्रण रेषेवरील भारताच्या कारवायांविरोधात पंतप्रधान शरीफ यांच्यासोबत आहोत. भारत-पाकिस्तान संबंधांसाठी हा टर्निंग पॉईंट असेल', असे पाकिस्तानी पीपल्स पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे. शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे इमरान खान या बैठकीला हजर नव्हते. मात्र त्यांचा पक्ष 'तेहरीक-ए-इन्साफ'चे प्रवक्ते या बैठकीला हजर होते.
आणखी बातम्या
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पंतप्रधान शरीफ यांच्यावर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तान एकटा पडताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे.