पनामा पेपर्सप्रकरणी नवाज शरीफ तपास समितीसमोर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 03:42 PM2017-06-15T15:42:44+5:302017-06-15T15:45:46+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या संयुक्त तपास समितीसमोर हजेरी लावली
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लमाबाद, दि. 15 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या संयुक्त तपास समितीसमोर हजेरी लावली. पंतप्रधानपदी असताना अशा प्रकारे एखाद्या आयोगासमोर हजेरी लावणारे नवाज शरिफ पहिलेच पंतप्रधान आहेत. शरीफ यांची मुलगी मरिअम नवाजने समितीसमोर हजेरी लावण्याआधी वडिल आणि त्यांच्या सहका-यांचा एक फोटो ट्विट केला. "आजच्या दिवशी इतिहास रचण्यात आला आहे. पंतप्रधानांनी एक उदाहरण उभं केलं आहे", असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
संयुक्त तपास समितीचे प्रमुख वाजिद जिया यांनी शरीफ यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रं सहा सदस्यीय समितीसमोर सादर केली. समितीसमोर हजर होण्याआधी नवाज शरीफ यांनी कुटुंबातील सदस्य आणि सहका-यांची भेट घेत चर्चा केली. कार्यकर्त्यांना आपल्यासोबत येण्यासाठी त्यांनी मनाई केली. शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होण्यासाठी नवाज शरीफ कझाकिस्तानला गेले होते. तेथून परतल्यानंतर लगेचच समितीसमोर हजर होण्याचा समन्स जारी करण्यात आला होता.
Meeting PMLN members who have come to receive him upon his arrival from Judicial complex. #NawazSharifIsMyPridepic.twitter.com/uy8L1yFdU4
— Maryam Nawaz Sharif (@MaryamNSharif) June 15, 2017
पनामा पेपर्स लीक प्रकरणातून अनेक जागतिक नेत्यांच्या परदेशात कंपन्या, बँक खाती असल्याचे समोर आले असून, यात नवाझ शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे. शहाबाज पंजाब राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांना 17 जूनला हजर होण्याचे आदेश दिले आहेत. शहाबाज यांना या प्रकरणी मंगळवारी समन्स मिळाले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाच्या परदेशातील मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने सहाजणांची संयुक्त तपास समिती स्थापन केली.
तपास पूर्ण करण्यासाठी संयुक्त तपास समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. समितीने शहबाज यांना कुठल्याही वकिलाशिवाय तसेच ते संचालक असलेल्या पेपर मीलची कागदपत्र घेऊन हजर राहण्यास सांगितलं आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने समितीला झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
20 एप्रिलला बहुचर्चित पनामा पेपर लिक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांना संयुक्त तपास टीमसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता तीन न्यायाधीशांनी पुढील तपास गरजेचा असल्याचं मत नोंदवलं, दोन न्यायाधीशांनी नवाज शरीफांना अपात्र ठरवलं.
पनामा पेपर लीक प्रकरणात 1990च्या दशकात शरीफ यांनी लंडनमध्ये घर खरेदी केल्यानंतर उघडकीस आलं होतं. शरीफ यांनी त्यावेळी दोनदा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश असिफ सईद खोसा यांनी या प्रकरणी सुनावणी केली. पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे सत्तारूढ असलेल्या पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.