नवाझ शरीफ, बिलावल भुट्टो की इम्रान खान... पाकिस्तानात सत्ता कोणाला मिळणार? पाहा रिपोर्ट काय सांगतोय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 10:12 AM2024-02-08T10:12:26+5:302024-02-08T10:14:10+5:30
या दोन पक्षांनंतर उर्वरित जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षासह अन्य पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 266 जागांवर मतदान होत असून 5121 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, एका रिपोर्टनुसार, नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PMLN) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो. यासोबतच बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) दुसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. या दोन पक्षांनंतर उर्वरित जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षासह अन्य पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सूत्रे, महसूल विभाग, कामगार संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुलाखतींच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस स्टेशन आणि युनियन कौन्सिल स्तरावरही मुल्यांकन (assessment) करण्यात आले आहे. या पाकिस्तानमधील सर्वात खालच्या प्रशासकीय संस्था आहेत.
रिपोर्टनुसार, नवाझ शरीफ यांचा पीएमएलएन पक्ष या निवडणुकीत 115 ते 132 जागा जिंकू शकतो. त्यात महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव जागाही जोडल्या गेल्या तर पीएमएलएन स्वबळावर सरकार स्थापन करेल. तसेच, सार्वत्रिक निवडणुकीत पीपीपीला 35 ते 40 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर पीटीआयच्या अपक्ष उमेदवारांना 23 ते 29 जागा मिळू शकतात. तर अल्ताफ हुसेन यांचा पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (MQM) 12-14 जागा, फजल उर रहमान यांच्या जमियत उलेमा-ए-इस्लामला 6-8 जागा, चौधरी शुजात हुसैन यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (कायद) आणि जहांगीर खान तरीन यांच्या इस्तेहकाम-ए- पाकिस्तान पक्षाला 2-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
650,000 सुरक्षा कर्मचारी तैनात
शेजारील देशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुमारे 650,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत देशातील 12.85 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील केल्या आहेत. मतदान अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आले.