नवाझ शरीफ यांनीच आपल्या भावाचा पंतप्रधानपदाचा पत्ता कापला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 04:52 PM2017-08-05T16:52:02+5:302017-08-05T16:58:21+5:30
नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.
लाहोर, दि. 5 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण आता पाकिस्तानात नवाझ शरीफ यांनी स्वत:च आपले बंधू शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवल्याची चर्चा रंगली आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षातील अनेक नेत्यांचे तसे ठाम मत असून, डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
नवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले. शहाबाज यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाब प्रातांची जबाबदारी आपल्याला मिळेल असा हमजा याचा कयास होता. पण पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले आहे.
शहाबाज शरीफ पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असून हा प्रांत पीएमएल-एऩ पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शहाबाज संसदेवर निवडून जाईपर्यंत फक्त 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत होते. पण आता शहाबाज यांची पंजाब प्रांताला गरज आहे अशा प्रकारचे कॅम्पेन सुरु झाले आहे. शहाबाज पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्विकारणार नाहीत याची फक्त औपचारीक घोषणा बाकी राहिली आहे असे पीएमएल-एन पक्षातील काही नेत्यांनी सांगितले.
नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.
नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.