देश सोडून पळून जाणार नवाज शरीफ !
By admin | Published: April 6, 2017 01:30 PM2017-04-06T13:30:42+5:302017-04-06T13:52:37+5:30
आजारपणाचा बहाणा करून उपचारासाठी बाहेर देशात जाऊन पुन्हा पाकिस्तानात न परतण्याचा शरीफ यांचा विचार...
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 6 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ देश सोडून पळून जाणार असल्याच्या अफवांना पाकमध्ये काही दिवसांपासून ऊत आला आहे. पनामागेट घोटाळ्यात अडचणी वाढल्यामुळे शरीफ पाकिस्तान सोडून जाणार असल्याची येथे जोरदार चर्चा आहे.
आजारपणाचा बहाणा करून उपचारासाठी बाहेर देशात जाऊन पुन्हा पाकिस्तानात न परतण्याचा त्यांचा विचार आहे अशा अफवा अनेक दिवसांपासून पाकिस्तानात पसरत आहेत. शरीफ हे देश सोडणार असल्याचं सांगत विरोधीपक्षाकडूनही सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शरीफ यांचं नाव पनामागेट घोटाळ्यात आलं होतं. तेव्हापासून ते देश सोडणार असल्याची चर्चा येथे रंगली आहे.
दुसरीकडे, शरीफ देश सोडून पळून जाणार असल्याच्या वृत्ताचा नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने खंडन केलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांविरोधात विरोधी पक्षांकडून रचण्यात आलेला हा कट आहे, ते जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असं पीएमएलएनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पनामागेट प्रकरणावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
गेल्यावर्षी ऑपरेशनसाठी नवाज शरीफ लंडनला गेले होते. त्यावेळीही पनामागेट प्रकरणात होणा-या संभावित कारवाईपासून वाचण्यासाठी शरीफ देशाबाहेर गेले असून आता ते देशात परतणार नाहीत अशी येथे चर्चा होती.
नवाज शरीफ यांना किडनी स्टोन झाल्यामुळे रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रूग्णालयातून त्यांना सुट्टी मिळाली असून 4 दिवसांच्या आरामानंतर शरीफ राजधानी इस्लामाबादमध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे असं स्पष्टीकरण पीएमएलएनकडून देण्यात आलं आहे.