नवाज शरीफ यांनी भारतात पाठवले ४.९ अब्ज डॉलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:14 AM2018-05-09T04:14:41+5:302018-05-09T04:14:41+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत.
यासंदर्भात वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या बातम्यांची नॅबचे अध्यक्ष व निवृत्त न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी आज स्वत:हून दखल घेतली व या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नॅबने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शरीफ यांनी केलेल्या या व्यवहाराची नोंद जागतिक बँकेने २०१६ साली घेतली होती.
शरीफ यांनी ही रक्कम भारताच्या वित्त खात्याला पाठविली. त्यानंतर भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ झाल्याचे दिसून आले होते. या व्यवहाराचे पाकिस्तानवर अनिष्ट परिणाम झाले होते. पनामा पेपर प्रकरणी शरीफ यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. तीन भ्रष्टाचार प्रकरणांत शरीफ यांच्या विरोधात अकाऊंटिबिलिटी कोर्टात सध्या खटले सुरु आहेत. त्यांची लाहोर येथील जती उम्रा भागात मालमत्ता असून तेथील एका रस्त्याचा अनधिकृतरित्या विस्तार केल्याप्रकरणी शरीफ यांची नॅबकडून चौकशी सुरु आहे. (वृत्तसंस्था)
भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहाण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागलेले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यास शरीफ यांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते.