झुल्फिकार भुट्टोंच्या 'त्या' निर्णयामुळे नवाझ शरीफ उतरले राजकारणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:54 PM2017-07-28T14:54:08+5:302017-07-28T15:01:28+5:30
नवाझ शरीफ यांना आज पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले असले तरी, उद्योजकता हाच नवाझ शरीफ यांच्या राजकीय प्रवेशाचा पाया होता.
लाहोर, दि. 28 - बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपामुळे नवाझ शरीफ यांना आज पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले असले तरी, उद्योजकता हाच नवाझ शरीफ यांच्या राजकीय प्रवेशाचा पाया होता. नवाझ शरीफ यांनी 1976 साली राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानातील अनेक उद्योगांचे राष्ट्रीयकरण केले होते. त्यात नवाझ शरीफ यांच्या कुटुंबाच्या स्टील उद्योगाचाही समावेश होता.
नवाझ शरीफ यांचे वडिल पाकिस्तानातील नावाजलेले उद्योजक होते. त्याच्या इत्तेफाक आणि शरीफ ग्रुपमधील स्टील उद्योगाचे राष्ट्रीयकरण झाल्यामुळे शरीफ कुटुंबात भुत्तो यांच्याबद्दल राग होता. उद्योगाचे राष्ट्रीयकरण करण्याच्या भुत्तो यांच्या निर्णयाला शरीफ कुटुंबाने अत्यंत गांर्भीयाने घेतले होते. राजकारणातही आपली पकड असावी असा विचार त्यांनी सुरु केला. नवाझ आपला बिझनेस पुढे चालवतील असे त्यांच्या वडिलांना वाटत नव्हते त्यामुळे त्यांनी नवाझ यांना राजकारणात पाठवले.
त्यावेळी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मजबूत पकड असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षात त्यांनी प्रवेश केला. 1981 साली जनरल झिया उल हक यांच्या मंत्रिमंडळात नवाझ प्रथम पंजाब प्रांताचे अर्थमंत्री झाले. 1985 साली ते पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. 1988 साली झियाउल हक यांचे निधन झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीगची दोन गटांमध्ये विभागणी झाली. शरीफ पीएमएलचे प्रमुख झाले पुढे हा पक्ष पीएमएल-एऩ बनला. पुढे जाऊन ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजकीय कारकीर्दीत तिस-यांदा नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. यापूर्वी दोनवेळा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात राजकीय भूकंपच आला आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले आहेत.