निशाण्यावर होते नवाझ शरीफ अन् मारले गेले विदेशी राजदूत ?
By admin | Published: May 8, 2015 04:26 PM2015-05-08T16:26:46+5:302015-05-08T17:28:19+5:30
पाकिस्तानमधील गिलगिट येथे फिलिपीन्स व नॉर्वेच्या राजदूतांना घेऊन जाणारे पाक सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ८ - पाकिस्तानमधील गिलगिट येथे फिलिपीन्स व नॉर्वेच्या राजदूतांना घेऊन जाणारे पाक सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात दोन्ही राजदूतांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून तालिबानने हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. आमचे टार्गेट विदेशी राजदूत नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ होते असा दावा तालिबानने केला आहे.
गिलगीट येथे इमर्जन्सी लॅंडिगच्या करत असताना पाक सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये नॉर्वे व फिलिपीन्सचे राजदूत, इंडोनिशा व मलेशिया या देशांच्या राजदूतांची पत्नी यांच्यासह सुमारे १८ जण प्रवास करत होते. अपघातात चौघा विदेशी नागरिकांसह हेलिकॉप्टरच्या दोघा चालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाक सैन्याने हा अपघात नसून दहशतवादी संघटनांचा या अपघाताशी काहीच संबंध नाही असा दावा केला आहे. तर तालिबानने हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. हे हेलिकॉप्टर ज्या मार्गावरुन जात होते त्याच मार्गावरुन दुस-या विमानातून नवाझ शरीफही जात होते. नवाझ शरीफ यांचे विमान आमचे टार्गेट होते असे तालिबानने म्हटले आहे.