नवाझ शरीफ यांना तुरूंगात विष दिले, मुलाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:56 PM2019-10-23T14:56:07+5:302019-10-23T14:57:20+5:30
नवाझ शरीफ यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर आहे. नवाझ शरीफ यांना तुरूंगात असताना विष देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. याबाबतची माहिती डॉन वृत्तपत्राने दिली आहे.
डॉन वृत्तपत्रानुसार, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या नवाझ शरीफ यांच्या मुलाने आपल्या वडिलांविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप केला. हुसेन नवाझ असे नवाझ शरीफ यांचा मुलगाचे नाव आहे. जर नवाझ शरीफ यांच्या प्रकृतीला काही झाले तर त्याला जबाबदार कोण असेल हे तुम्हाला ठाऊक आहे. हे त्यांना विष दिल्याचे लक्षण आहे, असा आरोप हुसेन नवाझ यांनी ट्विटरवरून केला आहे.
दरम्यान, नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून याप्रकरणी ते लाहोरमधील कोट लखपत तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. गेल्या सोमवारी नवाझ शरीफ तरूंगात असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीरातील रक्तपेशी कमी झाल्याने नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.