नवाज शरीफ यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी
By admin | Published: November 2, 2016 04:00 AM2016-11-02T04:00:10+5:302016-11-02T04:00:10+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दिवसेंदिवस अडचणीत येत चालले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ दिवसेंदिवस अडचणीत येत चालले आहे. त्यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नियुक्त करून, ही चौकशी करण्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
या न्यायालयीत आयोगाची कार्यकत्रा ठरविण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि याचिकाकर्त्यांनी आपल्या सूचना सादर कराव्यात, पण कार्यकक्षा ठरविण्याबाबत दोघांमध्ये एकमत न झाल्यास आम्हीच ती निश्चित करू, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्या. अन्वर झहीर जमाली यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाने हा आदेश दिला, तेव्हा पाकिस्तान सरकारमधील अनेक मंत्री, वकील तसेच इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पत्रकारांनी न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती.
नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा पनामा पेपर्समध्ये उल्लेख आल्यानंतर इम्रान खान आणि इतर अनेकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात केली आहे. (वृत्तसंस्था)
>काय आहेत
पनामा पेपर्स
शरीफ आणि त्यांच्या घरातील व्यक्तींनी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भातील पनामा पेपर्समध्ये नवाज यांच्या चारपैकी मरयम, हसन आणि हुसैन या तीन मुलांचा उल्लेख आहे. अनेक कंपन्यांतील आर्थिक व्यवहारांचे ते प्रमुख होते वा त्यांना त्या व्यवहारांचा अधिकार होता, असाही उल्लेख त्यात आहे.
>आंदोलनावर बंदी नाही
दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाने उद्या, बुधवारी इस्लामाबादमध्ये नवाज शरीफ सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचे ठरविले असून, त्यावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला. सरकार आणि आंदोलक या दोघांनी संयम पाळावा, असे आवाहन न्यायालयाने केले. त्यानंतर बोलताना इम्रान खान म्हणाले की, आमचे उद्याचे आंदोलन ठरल्यानुसार होईलच. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात आतापर्यंत ज्यांनी साथ दिली, त्यांचे आपण तयावेळी आभार मानणार आहोत. आपल्या समर्थकांना उद्देशून ते म्हणाले की आता तुम्ही शांतपणे घरी जा. तुम्हाला उद्या पुन्हा आभार प्रदर्शनासाठी यायचे आहे.नवाज शरीफ यांची चौकशी गुरुवारपासून सुरू होणार असल्यामुळे मी आनंदात आहे.