नवाजांचा तुरुंगात 'नवाबी थाट', 'शरीफकन्ये'ने नाकारली दर्जेदार सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:55 PM2018-07-14T22:55:48+5:302018-07-14T23:05:01+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तुरुंगात या दोघांनाही विशेष वागणूक मिळत आहे.
रावळपिंडी - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तुरुंगात या दोघांनाही विशेष वागणूक मिळत आहे. शरीफ आणि त्यांची कन्या मरियम सध्या रावळपिंडी येथील अडियाला तुरुगांत आहेत. पण, येथील तुरुंगात या दोघांनाही ब वर्ग सुविधा देण्यात येत आहे. त्यानुसार, बेड, खुर्ची, टी-पॉट, लाईट गेल्यानंतर विशेष सुविधाही पुरविण्यात येते.
एनएबी अधिकाऱ्यांनी नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना एवनफिल्ड संपत्ती प्रकरणात अटक केली आहे. शुक्रवारी लंडनहून लाहोरला येताच या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर अडियाला येथील तुरुंगात टाकण्यात आले आहे. मात्र, तुरुंगात त्यांना ब दर्जाची म्हणजे एसीसह उत्तम अशी सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. मात्र, मरियम यांनी तुरुंगातून एक नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये तुरुंग अधिक्षकांकडून आपणास विशेष सवलत ऑफर करण्यात आली होती. मात्र, आम्ही ती नाकारल्याचे मरियम यांनी म्हटले आहे. मी कुण्याच्याही दबावाचा विचार न करता, माझ्या स्वच्छेने सोयीसुविधा नाकारल्याचे मरियम यांनी म्हटले आहे.