नवाज शरीफांची 'पाक'वापसी, लंडन पोलिसांकडून नातवांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:41 PM2018-07-13T18:41:48+5:302018-07-13T18:44:31+5:30
लंडन पोलिसांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातवांना बेड्या ठोकल्या आहेत. नवाज यांचा नातू जुनैद सफदर आणि नात जकारिया हुसैन यांना लंडन पोलिसांनी अटक केली.
ब्रिटन - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ लाहोरसाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर, लंडन पोलिसांनी त्यांच्या नातवांना बेड्या ठोकल्या. नवाज यांचा नातू जुनैद सफदर आणि नात जकारिया हुसैन यांना लंडन पोलिसांनी अटक केली. शरीफ यांच्या लंडनमधील घराबाहेर आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकास धक्काबुकी करत मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ लंडनहून पाकिस्तानला परत येत आहेत. आज सकाळी ते लंडनहून रवाना झाले आहेत. नवाज यांच्यासोबत त्यांची मुलगी मरियमही पाकिस्तानला परत येत आहे. मात्र, लाहोर विमानतळावर पोहोचताच शरीफ आणि मरियम यांना अटक होण्याची शक्यता आहे. हेलिकॉप्टरमधून या दोघांना इस्लामाबाद येथे नेण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यानंतर अडियाला येथील तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. पनामा पेपर लीकनंतर नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या तीनपैकी एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानुसार एवनफील्ड संपत्ती प्रकरणी 11 वर्षांची सजा सुनाविण्यात आली आहे.
शरीफ यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर ते आज पाकिस्तानात वापसी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये दुपारी तीन ते रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी लंडनमधील त्यांच्या निवासस्थानाजवळ नागरिकांनी निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शरीफ यांच्या नातवांनी विरोध दर्शवला. त्यावेळी आंदोलकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप शरीफ यांच्या नातवांवर ठेवला असून त्यांना अटक झाली आहे.