नवाझ शरीफ ज्या विमानाने परतले, त्याच विमानात चोरी, हाणामारी;व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 08:25 AM2023-10-23T08:25:56+5:302023-10-23T08:26:54+5:30
शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबादला आले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ब्रिटनमधील चार वर्षांच्या विजनवासानंतर शनिवारी विशेष विमानाने मायदेशी परतले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांत आपल्या पक्षाचे नेतृत्व करून विक्रमी चौथ्यांदा विजय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पाकमध्ये जानेवारीत निवडणूक होणार आहे. मात्र, शरीफ ज्या विमानानेपाकिस्तानात परतले, त्याच विमानात गोंधळ झाल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबादला आले. याच विमानात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकही होते. त्यांनी खान साहब झिंदाबाद अशी घोषणाबाजी विमानात केली. तर, या विमानातील काही लोकांचं सामानही चोरी झाल्याचं उघडकीस आलं. विशेष म्हणजे सामान चोरी झाल्याचे समजताच विमानात तपासणी सुरू झाली. त्यावेळी, गोंधळ निर्माण होऊन काही जणांमध्ये हाणामारीही झाल्याचं समोर आलं आहे. विमानातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
A fight broke on the flight in which Nawaz Sharif was traveling when PMLN leader Malik Noor Awan's luggage went missing#SamaaTV#NawazSharifReturn#NawazSharif#PMLN#MaryamNawaz#ShehbazSharif@AsimNaseer81@azharjavaidukpic.twitter.com/kGmJeUpMjK
— SAMAA TV (@SAMAATV) October 21, 2023
या विमानात शरीफ यांच्या पक्षाचे नेते पीएमएल-एन (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) पक्षाचे नेते मलिक नूर अवान यांचं सामान हरवल्याचे समोर आले. त्यामुळे, प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू झाली होती.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये येताच न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीन प्रक्रियेचा भाग म्हणून उच्च न्यायालयात सादर करावयाच्या काही कायदेशीर कागदपत्रांवर विधी पथकाने त्यांची स्वाक्षरीही घेतली.
विमानतळावर म्हणाले, आज मी आनंदी
दुबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी पाकमधील ‘अत्यंत अराजक’ परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले व संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपला पक्ष सक्षम असल्याचे सांगितले. शरीफ म्हणाले, ‘जेव्हा मी पाकिस्तान सोडून परदेशात जात होतो तेव्हा मनात आनंदाची भावना नव्हती; पण आज मी आनंदी आहे. २०१७ नंतर देशाची परिस्थिती बिघडत गेली. तेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निरोप घेतला होता, वीज स्वस्त होती. गरीब कुटुंबातील मुलगा शाळेत जात होता आणि औषधेदेखील स्वस्त होती.