नवाज शरिफ अडचणीत; लष्करही जाणार विरोधात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:29 AM2017-07-18T03:29:37+5:302017-07-18T03:29:37+5:30
पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली
इस्लामाबाद : पनामा पेपर्स घोटाळाप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू झाली असून, हा घोटाळा नवाज शरिफ यांना अडचणीत आणेल, अशी चर्चा पाकिस्तानात सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने गेल्या आठवड्यातच आपला अहवाल न्यायालयाला सादर केल्यानंतर आज सुनावणीला सुरुवात झाली. तपास पथकाने अहवालात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह त्यांची मुलं हसन नवाज, हुसेन नवाज आणि मुलगी मरियम यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारस केली आहे.
तपास पथकाच्या अहवालानंतर शरिफ यांनी आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भावत नाही, आपण काहीही कमावले नसून, भरपूर गमावले आहे, असा दावा केला. तरीही त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.
कडेकोट सुरक्षा
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहेत. ७00 हून अधिक पोलीस शिपायांसह रेंजर्सवर सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे न्यायाधीश तसेच तपास पथकाचे अधिकारी व शरिफ कुटुंबीय यांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली.