"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:24 IST2024-12-17T09:24:27+5:302024-12-17T09:24:48+5:30
१९७१ च्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टवर बांगलादेशी मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे.

"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप
Bangladesh leaders on PM Modi Post: १९७१ च्या युद्धाचा ऐतिहासिक विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धात सहभागी झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र आता बांगलादेशचे नेते विजय दिवसासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टवर आक्षेप घेत आहेत. मुख्यमंत्री मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा भाग असलेले सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटलं की, १९७१ च्या युद्धात भारत फक्त एक मित्र होता. याशिवाय विद्यार्थी चळवळीतील एक प्रमुख चेहरा हसनत अब्दुल्ला यांनी हा थेट बांगलादेशच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता बांगलादेश कृतघ्न झाल्याचे म्हटलं जात आहे.
१९७१ च्या युद्धात भारताच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करत भारताच्या विजयात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटलं होतं. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कायदा मंत्री आसिफ नजरुल यांनी मोदींच्या या पदावर आक्षेप घेतला आहे. भारत आणि बांगलादेश यांनी १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धाचा ५३ वा वर्धापन दिन साजरा केला. या विजयासंदर्भात दोन्ही देशांनी कोलकाता आणि ढाका येथे कार्यक्रमही आयोजित केले होते.
मात्र आसिफ नजरुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून टीका केली आहे. "मी याचा तीव्र निषेध करतो. १९७१ चा विजय हा बांगलादेशचा विजय आहे. भारत त्यात फक्त मित्र होता," असं नजरुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. आसिफ नजरुल यांनी त्यांच्या पोस्टसोबत पंतप्रधान मोदींच्या पोस्टचा स्क्रीनशॉटही जोडला आहे.
हसनत अब्दुल्लाने पंतप्रधान मोदींच्या पोस्टवरुन नाराजी व्यक्त केली. हे बांगलादेशचे स्वातंत्र्य युद्ध होते. हे पाकिस्तानपासून बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे युद्ध होते. पण हे युद्ध केवळ भारताचेच होते आणि ते त्यांचे यश असल्याचा दावा मोदींनी केला. बांगलादेशच्या अस्तित्वाला त्यांच्या भाषणातून आव्हान देण्यात आले आहे. भारताकडून येणाऱ्या या धोक्याविरुद्ध आपण लढा सुरू ठेवला पाहिजे, असं हसनत अब्दुल्लाने म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
"आज विजय दिवसाच्या दिवशी, १९७१ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान देणाऱ्या त्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा आम्ही आदर करतो. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आदरांजली आहे. त्यांचे बलिदान पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासात खोलवर जडत राहील," असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.
दरम्यान, या युद्धात भारताने पाकिस्तानी लष्कराला दारुण पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानच्या ९३,००० सैनिकांना भारतीय लष्कराने आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. या विजयानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो.