लोकशाहीची मूल्यं ही देशाचा आत्मा, त्यापेक्षा सत्ता अहंकार मोठा नाही याचं राज्यकर्त्यांनी भान ठेवावं : रोहित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 02:28 PM2021-02-05T14:28:49+5:302021-02-05T14:30:32+5:30
लोकशाहीच्या निर्देशांकात भारताची झाली ५३ व्या स्थानी घसरण
जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही निर्देशांत्या २०२० च्या सूचीत ५३ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारताची या यादीत दोन क्रमांकानं घसरण झाली. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटनं (इआययू) २०२० च्या लोकशाही निर्देशांकाची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. लोकशाहीच्या मूल्यांकडे पाठ फिरवणं आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात कारवाईंमुळे भारताची या क्रमवारीत घसरण झाल्याचं इआययूनं आपल्या 'डेमोक्रसी इन सिकनेस अँड इन हेल्थ' या अहवलातून म्हटलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे.
"इआययूच्या लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत असून २०१४ मध्ये असलेलं २७ वं स्थान २०२० मध्ये ५३ पर्यंत घसरलंय. हे नागरिकांसाठी घातक आहे. लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं," असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली.
According to the #EIU democratic index global ranking, India has slipped to 53rd position in 2020 from 27th position in 2014. This is extremely dangerous for our country. Nothing should be more valuable than our democratic values.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 5, 2021
काय म्हटलंय अहवालात?
भारताचा शेजारी राष्ट्रांपेक्षा क्रमांक वरचा असला तरी भारताला २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमी गुण मिळाले आहेत. २०१९ मध्ये भारताला ६.९ तर २०२० मध्ये भारताला ६.६१ गुण मिळाले. भारतात सध्या मोठं दडपण असल्याचं सांगत भारताची कामगिरी खालावल्याचं अहवालातून सांगण्यात आलं आहे. यामध्ये तब्बल १६७ देशांचा सहभाग करण्यात आला असून २३ देशांमध्ये पूर्ण लोकशआही, ५२ देश सदोष लोकशाही, ३५ देश मिश्र सत्तेत तक ५७ देशांचं हुकुमशाही या श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. अमेरिका, ब्राझील, बेल्जिअम आणि फ्रान्स या देशांसोबत भारताचा समावेश सदोष लोकशाही श्रेणीत करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर नॉर्वे, नंतर आइसलँड, स्वीडन, न्यूझीलंड, कॅनडा, फिनलंड, डेन्मार्क, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड या देशांचा पहिल्या दहामध्ये समावेश होतो. तर या यादीत उत्तर कोरियाला शेवटचं म्हणजेच १६७ वं स्थान देण्यात आलं आहे.