Needle Attack In France: फ्रांसमध्ये 100 तरुणींवर सुईने हल्ला, माथेफिरू अटकेत; आता पीडितांची HIV चाचणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:07 PM2022-06-07T17:07:50+5:302022-06-07T17:07:59+5:30
Needle Attack In France: शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान 20 तरुणींवर सुईने हल्ला करण्यात आला, त्यानंतर रविवारी संशयित आरोपीला अटक झाली.
पॅरिस:फ्रान्समध्ये शंभर तरुणींवर इंजेक्शनच्या सुईने हल्ला केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 20 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण फ्रान्सच्या टूलॉनमधील रिव्हिएरा बीचवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान सुईने 20 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी रविवारी या तरुणाला अटक केली.
ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. टूलॉनमधील वकिलांनी सांगितले की, दोन महिलांनी संशयिताला ओळखले आहे. या व्यक्तीवर गंभीर आणि पूर्वनियोजित सशस्त्र हिंसाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपीने प्राणघातक हल्ल्याचे आरोप फेटाळून लावल्याचे सरकारी वकिलांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र साक्षीदारांचे पुरेसे जबाब आहेत, त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले जाऊ शकते.
मुलींना टार्गेट केले जात आहे
या वर्षाच्या सुरुवातीपासून सुईने हल्ल्याची सुमारे 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातून मुलींना टार्गेट केले जात आहे. ज्या मुलींना लक्ष्य केले जाते त्यांना मळमळ, चक्कर येणे आणि तीव्र वेदना यासारखी लक्षणे जाणवत आहेत. त्यांच्या त्वचेवर सुई टोचण्याच्या खुणा आढळल्या आहेत. जिथे सुई टोचली जाते तिथे त्वचेचा रंगही बदललेला दिसतो. या हल्ल्यांमध्ये इतरांना वापरलेली सुई टोचली असवी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
HIV चाचणी होणार
बीचवर घडलेल्या घटनेनंतर देशभरातील विविध शहरांमधून अशा अनेक घटना समोर येत आहेत. यात प्रामुख्याने तरुण मुलींना टार्गेट केले जात आहे. आता यातील बहुतेक पीडितांची एचआयव्ही चाचणी केली जाणार असून, अनेकांना हिपॅटायटीससाठी प्रतिबंधात्मक औषधेही देण्यात आली आहेत.