‘निष्काळजी’ आईला तुरुंगवास!
By admin | Published: October 11, 2015 05:02 AM2015-10-11T05:02:18+5:302015-10-11T05:02:18+5:30
आपला तीन वर्षांचा मुलगा बुडत असता त्याला वाचविण्याऐवजी मोबाइलवर ‘फेसबूक’ पाहण्यात गुंग राहिलेल्या ब्रिटनधील एका मातेला येथील न्यायालयाने मुलाचा छळ केल्याबद्दल
लंडन : आपला तीन वर्षांचा मुलगा बुडत असता त्याला वाचविण्याऐवजी मोबाइलवर ‘फेसबूक’ पाहण्यात गुंग राहिलेल्या ब्रिटनधील एका मातेला येथील न्यायालयाने मुलाचा छळ केल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
‘गार्डियन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, हल क्राऊन कोर्टाने शुक्रवारी ३१ वर्षांच्या क्लेअर बार्नेट या महिलेस ही शिक्षा देताना पालक म्हणून कर्तव्य न बजावल्याचा तिच्यावर ठपका ठेवला व तिच्या या वर्तनाने तिने काळजी घ्यायला हवी अशा कोणत्याही मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे नमूद केले.
क्लेअरचा तीन वर्षांचा मुलगा जोशुआ हा पूर्व यॉर्कशायरमधील बेवर्ली येथील त्यांच्या घरासमोरील बागेत खेळत असताना एका तळ्यात पडून १७ मार्च २०१४ रोजी मरण पावला होता. तो बुडाला तेव्हा क्लेअर मोबाइल फोनवर ‘फेसबूक’ पाहण्यात एवढी दंग होती की तिच्या ते लक्षातही आले नाही. थोड्या वेळाने लक्षात आल्यावर तिने जोशुआला पाण्यातून बाहेर काढले, पण त्याचा इस्पितळात मृत्यू झाला, असे आलेल्या साक्षी-पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे.
ब्रिटनमधील कायद्यानुसार स्वत:च्या अपत्यांचा नीट सांभाळ न करणे व त्यांना क्रूरपणाची वागणूक देणे याबद्दल पालकांना जबाबदार धरले जाऊ शकते. क्लेअरवरही अशाच क्रौर्याबद्दल खटला दाखल केला गेला होता. जोशुआची काळजी घेण्याऐवजी त्याच्याकडे प्राणघातक दुर्लक्ष करणे हेही क्रौर्यातच मोडते, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. जोशुआकडे तिचे नेहमीच लक्ष नसायचे. पूर्वीही एकदा आईचे लक्ष नसल्याने जोशुआ खेळत खेळत बाहेर रस्त्यावर धावत आला होता व मोटारीखाली येता येता बचावला होता. शेजाऱ्यांनी न्यायालयात साक्ष देताना ही घटनाही विशद केली. त्यावरून जोशुआ बुडत
असताना क्लेअरचे त्याच्याकडे लक्ष नसणे ही केवळ एकदा घडलेली घटना नाही, तर एकूणच ती मुलाची काळजी घेण्यात बेफिकीर असायची, असे दिसून आले. (वृत्तसंस्था)
...तर त्या मुलांना तुझ्यापासून धोका
तुझ्या निष्काळजी वर्तनाने तुझा मुलगा दगावला. याचे शल्य तुला आयुष्यभर बोचत राहणार आहे. एक पालक असूनही तुझे हे वर्तन म्हणजे पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यात सतत कमी पडणे आहे. त्यामुळे ज्या मुलांची जबाबदारी तुझ्यावर असेल त्यांना तुझ्यापासून धोका आहे.
- न्यायाधीश जेरेमी रिचर्डसन (क्लेअरला शिक्षा सुनावताना)