आर्मस्ट्राँगने चंद्रावरून आणलेल्या मातीसाठी नासावर खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 01:16 PM2018-06-13T13:16:41+5:302018-06-13T13:25:53+5:30
लॉरा मरे यांना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या आईने सिनसिनाटी या शहरात राहात असताना एक मातीने भरलेली काचेची कुपी आणि एक पत्र दिले होते.
वॉशिंग्टन- परग्रहावरील वस्तू, माती, दगड कोणतेही अवशेष कोणत्याही नागरिकाच्या ताब्यात असल्यास अमेरिकन अंतराळविज्ञान संस्था नासा ते आपल्या ताब्यात घेते. मात्र चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगने आणलेल्या मातीमुळे नवे प्रकरण कोर्टात उभे राहाणार आहे.
लॉरा मरे यांना वयाच्या दहाव्या वर्षी त्यांच्या आईने सिनसिनाटी या शहरात राहात असताना एक मातीने भरलेली काचेची कुपी आणि एक पत्र दिले होते. या पत्रावर एका ओळीत टू लॉरा अॅन मरे- बेस्ट ऑफ लक- नील आर्मस्ट्राँग अपोलो 11 असे लिहिले होते. त्यानंतर अनेक दशके लॉरा यांनी हे पत्र व कुपी पाहिलीच नव्हती. पाच वर्षांपुर्वी त्यांचे आई-वडिल वारल्यावर त्यांच्या वस्तू पाहाताना लॉरा यांना ही कुपी व पत्र मिळाले. ही कुपी मिळताच अपल्याला अत्यंत आनंद झाला आणि आपण धावतपळत येऊन ही कुपी व पत्र माझ्या पतीला दाखवले असे लॉरा सांगतात.
ही कुपी व पत्र आपल्याकडेच राहावे यासाठी नासावर खटला भरला आहे. नासाने अजून या कुपीवर आपला हक्क दाखवलेला नाही मात्र आजवर अशा वस्तू जप्त करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. नील आर्मस्ट्राँगने हे माझ्या बाबांचे मित्र होते. ते दोघेही अमेरिकेच्या हवाई दलामध्ये वैमानिक होते. तसेच त्या दोघांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सेवा बजावली होती. माझे बाबा व नील यांनी राजकीय व्यक्ती तसेच अनेक मोठ्या उच्चपदस्थांसाठी वैमानिकाचे काम गेले व क्वाएट बर्डमेन नावाच्या वैमानिकांच्या गुप्त गटाचे ते सदस्य होते. नील यांनी मला ही कुपी व पत्र भेट म्हणून दिले होते. ते सिनसिनाटीच्या विद्यापिठात एअरोस्पेस इंजिनियरिंगचे प्राध्यापक होते तेव्हा त्यांनी ही कुपी मला भेट दिली होती.
चंद्रावरील माती किंवा धूळ जप्त करण्याच कोणताही कायदा नाही त्यामुळे ती कुपी बाळगण्यात काहीच अयोग्य नाही असे लॉरा यांचे वकिल ख्रिस्तोफर मॅकॉ यांनी स्पष्ट केले आहे. यामातीचे परीक्षण केल्यावर एका परिक्षणात ही माती चंद्रावरची असू शकते असा अहवाल आला तर दुसऱ्यामध्ये ही माती पृथ्वीवरची असल्याचा अहवाल आला तर काही तज्ज्ञांच्या मते यामध्ये या मातीत पृथ्वीवरची मातीही मिसळली गेली असावी.