नेपाळला दोन दिवसांत 45हादरे
By admin | Published: April 27, 2015 11:14 PM2015-04-27T23:14:38+5:302015-04-27T23:14:38+5:30
नेपाळला शनिवारी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला. गेल्या ८० वर्षांतला नेपाळमधील हा सर्वांत भीषण भूकंप म्हणून मानले जात आहे.
लंडन : नेपाळला शनिवारी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला. गेल्या ८० वर्षांतला नेपाळमधील हा सर्वांत भीषण भूकंप म्हणून मानले जात आहे. रविवारीही नेपाळला पुन्हा एकदा जीव हेलावून टाकणाऱ्या भूकंपाचे हादरे बसले. रविवारी ६.७ एवढ्या सर्वाधिक तीव्रतेचा धक्का नेपाळला बसला. मात्र, सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे या दोन दिवसांत नेपाळमध्ये अंदाज लावू शकत नाही, एवढ्या वेळा धरणीकंप झाला.
४युरोपियन मेडिटेरिअन सिस्मॉलॉजिकल सेंटर अर्थात ईएमएससीच्या मते, नेपाळमध्ये शनिवारी आणि रविवारी आलेल्या भूकंपात एकूण ३९ वेळा धक्के बसले. यांची रिश्टर स्केलवरील तीव्रता ४ हून अधिक नोंदली गेली आहे. यापैकी १५ भूकंपांची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ५ हून अधिक मोजली गेली.
४रिश्टरवर चारहून अधिक तीव्रता असलेल्या भूकंपाची संख्या रविवारी ६ होती. म्हणजेच ईएमएससीच्या मते, नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांत रिश्टर स्केलवर चार वा अधिक तीव्रता असलेल्या भूकंपाचे ४५ हादरे बसले. एवढेच नाहीतर यादरम्यान जगभरात एकूण ६६ वेळा रिश्टर स्केलवर ४ हून अधिक तीव्रतेचे भूकंप आले.
पाकमध्ये वादळी पावसाचे ४५ बळी
पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला रविवारी वादळी पावसाचा भयंकर तडाखा बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडण्यासह अनेक इमारतीही भुईसपाट झाल्या. यामध्ये ४५ ठार, तर 2०० जण जखमी झाले. वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन निम्मा प्रांत रात्रभर अंधारात बुडाला होता. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्युतपुरवठा पूर्ववत होऊ शकला, अशी माहिती प्रांतिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले.
(पीडीएमए) एका अधिकाऱ्याने दिली.
वादळी पावसाच्या तडाख्याने पेशावरमध्ये २५ जणांचा बळी गेला, तर चारसदा आणि नौशेरा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे आठ व पाच जण मृत्युमुखी पडले. वादळी पावसामुळे प्रांतातील रस्त्यांसह विद्युत पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. जखमींत अनेक मुलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लष्कराची मदत व बचाव पथके पावसाचा तडाखा बसलेल्या भागामध्ये दाखल झाली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. घरे कोसळून तसेच पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत आतापर्यंत ४५ ठार, तर २०० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती प्रांतिक माहितीमंत्री मुश्ताक गनी यांनी दिली. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
वाऱ्याचा वेग ताशी ११० कि. मी. इथपर्यंत गेला होता, असे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले.
रात्री आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्याने पेशावर विमानतळावरील सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. बचाव कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र, जलमय रस्त्यांमुळे त्यांच्या कामात अडथळे येत होते. झाडे व विद्युत खांब रस्त्यावर कोसळलेले असल्यामुळे रुग्णवाहिका आणि बचाव वाहनांना काही भागांत पोहोचणे कठीण बनले होते.