मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, अनेकांच्या मृत्यूची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:47 PM2024-08-23T13:47:41+5:302024-08-23T13:48:26+5:30
या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे.
नेपाळमधून एका मोठ्या दुर्घटनेचे वृत्त समोर आले आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कसळली आहे. बचावकार्य सुरू असून यात अनेकांचा बळी गेला असल्याची शक्यता आहे. यासंदर्भात नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्याम माहितीनुसार, 40 जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तनहुन जिल्ह्यातील मार्सयांगडी नदीत कोसळली.
जिल्हा पोलीस कार्यालय तनहूनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस नदीत कसळली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही बस पोखरा येथून काठमांडूला जात होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
अनेक जण बेपत्ता -
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. बसमध्ये 40 लोक बसलेले होते. यांपैकी काहींचे रेस्क्यू करण्यात आले आहे. मात्र अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना तानाहून जिल्ह्यात घडली आहे. संबंधित बस उत्तर प्रदेशातील आहे. मात्र, बसमध्ये बसलेले लोक उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातून नेपाळला गेले होते? यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही.
...म्हणून घडली घटना -
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा क्रमांक UP FT 7623 हा आहे. ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात असताना नदीत पडला. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
नेपाळमधील माध्यमांनी दिलेल्या वृतत्तांनुसार, ही बस पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीत कोसळली. प्राथमिक दृष्ट्या वळणावर बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे दिसत आहे. या अपघातात अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता असून काहींना रेस्क्यूही करण्यात आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू आहे.