नेपाळ-चीन रेल्वे जाणार माऊंट एव्हरेस्टमार्गे
By admin | Published: April 10, 2015 12:29 AM2015-04-10T00:29:16+5:302015-04-10T00:29:16+5:30
तिबेट व नेपाळ यांच्या दरम्यान ५४० कि.मी.चा रेल्वेमार्ग बांधण्याची चीनची योजना असून, हा मार्ग माऊंट एव्हरेस्टच्या खाली बोगद्यातून जाईल.
बीजिंग : तिबेट व नेपाळ यांच्या दरम्यान ५४० कि.मी.चा रेल्वेमार्ग बांधण्याची चीनची योजना असून, हा मार्ग माऊंट एव्हरेस्टच्या खाली बोगद्यातून जाईल. शेजारी देशांत प्रभाव वाढविण्याच्या चीनच्या या प्रयत्नाने भारताला काळजी वाटू शकते.
चीनचे सरकारी वृत्तपत्र चायना डेलीतील वृत्तानुसार किंघाई - तिबेट रेल्वेचा विस्तार चीन - नेपाळ सीमेपर्यंत केल्यास दोन्ही देशांचा व्यापार व पर्यटन वाढेल. हा रेल्वेमार्ग २०२० पर्यंत पूर्णत्वाला जाईल. या योजनेला किती खर्च येईल हे या वृत्तात स्पष्ट केलेले नाही. किंघाई - तिबेट रेल्वेमार्ग चीनला तिबेटची राजधानी ल्हासा व इतर भागाशी जोडतो. चीनच्या इंजिनिअरिंग अकादमीतील रेल्वे तज्ज्ञ वांग मेंगशू यांच्या मते चीन ते नेपाळ रेल्वेमार्ग बांधताना अभियंत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा प्रकल्प सत्यात आल्यास परस्पर व्यापार, विशेषत्वाने कृषी उत्पादनांचा व्यापार वाढू शकतो, दोन्ही देशातील लोकांची ये-जा वाढू शकते, तसेच पर्यटनाचा विस्तार होऊ शकतो.