नेपाळ दुर्घटना: "पायलटने विमान गावापासून दूर नेले नसते तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:48 AM2023-01-16T09:48:49+5:302023-01-16T09:49:08+5:30
नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव
काठमांडू : ‘मी सकाळी घराबाहेर बसतो. त्यानंतर एक विमान आकाशात विचित्र पद्धतीने उडताना दिसले. ते जमिनीपासून खूप उंच होते. त्यानंतर ते अचानक वेगाने खाली आले, अचानक कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि विमान जोरात जमिनीवर धडकले,’ असा अनुभव रविवारचा विमान अपघात पाहिलेल्या विकास बुसियाल या व्यक्तीने सांगितला.
एका प्रत्यक्षदर्शीने तर हे विमान नागरी वस्तीत पडण्याची शक्यता होती, परंतु वैमानिकाने प्रसंगावधान राखून डोंगरावरील निर्जन ठिकाणी नेले, असे सांगितले.
पतीनंतर पत्नीचाही वाईट शेवट...
अपघातग्रस्त यती विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा होती. सहवैमानिक म्हणून हे त्यांचे शेवटचे उड्डाण होते. त्यानंतर त्या वैमानिक झाल्या असत्या. पण नियतीला ते मंजूर नव्हते. कॅप्टन के. सी. यांना विमान उडवण्याचा ३५ वर्षांचा अनुभव होता. त्यांनी अनेक वैमानिकांना प्रशिक्षण दिले होते. विशेष म्हणजे १६ वर्षांपूर्वी यती एअरलाइन्सच्या एका विमानाचा अपघात झाला होता. त्यात अंजू यांचे पती को-पायलट दीपक पोखरेल यांचा मृत्यू
झाला होता.
फेसबुक लाइव्ह...
प्रवाशी सोनू जयस्वाल हे विमानातून फेसबुक लाइव्ह करत असतानाच हे विमान कोसळले. सोनू विमानाबाहेरची दृश्ये फेसबुक लाइव्ह करत होते. या व्हिडीओच्या शेवटी प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येतात. विमान कोसळल्यानंतरचे काही चित्रण या व्हि़डीओत आहे.
हिमालयाचे आव्हान
नेपाळमध्ये वैमानिकांना खरे आव्हान हिमालयातील उंच पर्वत शिखरांचेच आहे. जुनाट विमानेही अपघातांना हातभार लावत आहेत. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अनुभवी वैमानिक यामुळे नेपाळला उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनवले आहे.
पाच वर्षांतील मोठे अपघात
- १ मार्च २०२२ : ‘ईस्टर्न एअरलाइन्स’चे बोईंग-७३७-८०० हे विमान गुआंक्सी पर्वतावर आदळले होते. या अपघातात विमानातील सर्व १३२ जणांचा मृत्यू झाला होता.
- ९ जानेवारी २०२१ : बोईंग ७३७ हे विमान जावा समुद्रात कोसळले. यात १० मुलांसह ६२ प्रवाशांचा मृत्यू झाला.
- ८ जानेवारी २०२० : युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सचे विमान पीएस ७५२ हे इराणची राजधानी तेहराण येथे विमान उड्डाण करताच कोसळले. यात सर्व १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
- २२ मे २०२० : पाकिस्तान एअरलाइन्सचे एअरबस-ए-३२० या विमानाला कराची येथे अपघात होत १०५ जणांचा मृत्यू झाला.
- ७ ऑगस्ट २०२० : केरळमधील कोझिकोड येथे दुबईहून येणारे एअर इंडियाचे विमान लँडिंगनंतर धावपट्टीच्या बाहेर जावून कोसळले. यात १८६ लोक होते. पायलट आणि सहवैमानिकासह एकूण २१ जणांचा यात मृत्यू झाला होता.
- १० मार्च २०१९ : इथियोपियन एअरलाइन्सचे विमान अदिस-अबाबाहून टेकऑफ झाल्यानंतर सहा मिनिटांनी क्रॅश झाले. ३० देशांतील १५७ लोक होते. यात कोणीही वाचले नाही.