Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:37 AM2024-09-30T10:37:34+5:302024-09-30T10:50:10+5:30
Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं आहे.
नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १७० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ४२ जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूची मुख्य नदी बागमती धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. परिस्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषीराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये १११ जण जखमी झाले आहेत. पोखरेल म्हणाले की, सर्व सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. लष्कराने देशभरात अडकलेल्या १६२ लोकांना एअरलिफ्ट केले आहे. याशिवाय लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी बाधित भागातून ४,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लोकांना अन्नधान्यासह सर्व आवश्यक मदत साहित्य वाटप करण्यात आले आहे.
भूस्खलन आणि पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत होत आहेत. त्यामुळे शेकडो लोक येथे अडकून पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग खुले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काठमांडूला इतर जिल्ह्यांशी जोडणारा मुख्य भूमार्ग असलेल्या त्रिभुवन महामार्गावर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमध्ये किमान ३२२ घरे आणि १६ पुलांचं नुकसान झालं आहे.
शनिवारी काठमांडूच्या सीमेला लागून असलेल्या धाडिंग जिल्ह्यात भूस्खलनामुळे बसमधील किमान १९ जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भक्तपूर शहरात दरड कोसळल्याने घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मकवानपूर येथील 'ऑल इंडिया नेपाळ असोसिएशन' संचालित प्रशिक्षण केंद्रात भूस्खलनाच्या घटनेत सहा फुटबॉल खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला आणि इतर पुराच्या पाण्यात वाहून गेले.