भारतविरोधासाठी नेपाळचा वापर कदापी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:06 AM2018-05-13T01:06:58+5:302018-05-13T01:06:58+5:30
भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळच्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, असे आश्वासन नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिले.
काठमांडू: भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळच्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, असे आश्वासन नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिले.
नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर ओली म्हणाले की, भारताची नेपाळविषयी असलेल्या मैत्री व सद्भाव याची आम्हाला कदर आहे. भारत व नेपाळ यांच्यातील सीमा १८५0 किलोमीटरची असून, तेथून जनतेची सतत ये-जा असते. त्यामुळेच नेपाळच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ न देणे, हे आमचे कर्तव्य आहे.
नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान के. पी. ओली, राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी, उपराष्ट्रपती नंदबहादुर पन, नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञावली यांच्याशी चर्चा केली, तर आज माजी पंतप्रधान व कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड, शेरबहादुर देवबा, राष्ट्रीय जनता पार्टीचे प्रमुख महन्त ठाकूर यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांची चर्चा केली. संध्याकाळी ते दिल्लीला पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या नेपाळ दौºयात शनिवारी पशुपतीनाथ मंदिरात तसेच मुक्तिनाथ मंदिरात जाऊ न पूजाअर्चा केली. नेपाळमधील ही दोन्ही मंदिरे अतिशय प्रसिद्ध
असून, मुक्तिनाथ मंदिरात तर हिंदुंप्रमाणेच बौद्ध समाजाचेही लोक जातात. मुक्तिनाथ मंदिरात जाणारे नरेंद्र मांदी हे पहिले जागतिक नेते आहेत.
मुक्तिनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून १२ हजार १७२ फूट उंचीवर आहे. या मंदिरात भगवान विष्णूची सोन्याची मूर्ती असून, मुक्तिनाथ म्हणून त्यांची केली जाते. या मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी पाहुणे आहेत, असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी शुक्रवारीच सांगितले होते. मुक्तिनाथ मंदिरानंतर बागमती नदीच्या तीरावरील पशुपतीनाथाच्या मंदिरात त्यांनी काही वेळ घालवला. नेपाळमधील सर्वात प्राचीन शिव मंदिर म्हणून त्याची ओळख आहे. तेथील अभ्यागतांच्या वहीमध्ये त्यांनी आपल्या भावनाही लिहिल्या. मोदी यांनी काल जनकपूरच्या जानकी मंदिरालाही भेट दिली होती.