Nepal Plane Crash: पायलटचा थकवा की तांत्रिक बिघाड...नेपाळ विमान अपघाताचे नेमकं कारण काय?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:00 AM2023-01-16T09:00:51+5:302023-01-16T09:09:48+5:30
Nepal Plane Crash: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६८ जणांचा मृत्यू झाला.
काठमांडू: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळी प्रवासी विमान रविवारी पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळून ६९ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोखरा विमानतळाचे १५ दिवसांपूर्वीच १ जानेवारीला उद्घाटन झाले होते.
यती एअरलाइन्सच्या एएन-एएनसी एटीआर ७२ विमानाने सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. अकराच्या सुमारास पोखरा विमानतळावर उतरत असताना जुन्या व नवीन विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले. १० परदेशी प्रवाशांसह विमानात ६८ प्रवासी आणि चार विमान कर्मचारी होते. रात्री उशिरापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्याखालून ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
नेपाळला जाणार्या प्रमुख भारतीय एअरलाइन्समधील पायलटने सांगितले की, पायलटच्या थकव्यासह अपघाताची अनेक कारणे असू शकतात. त्यांनी सांगितले की, विमान उडवताना प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावे लागतात आणि पायलटला चांगली विश्रांती आवश्यकता असते. त्यामुळे, पायलटच्या थकव्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एटीआर विमानाच्या पायलटने सांगितले की, अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड किंवा पायलटची चूक असू शकते. मात्र, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 ने सांगितले की, हे विमान १५ वर्षे जुने ATR 72-500 आहे. त्याचा नोंदणी क्रमांक 9N-ANC आहे आणि अनुक्रमांक ७५४ असा होता.
बघ्यांची गर्दी, बचावकार्यात अडथळे-
अपघातानंतर पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी सर्व येणाऱ्या आणि जाणाया विमानांसाठी बंद केले आहे. आग आटोक्यात आणणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाची गाडी दुर्घटना घडली त्या ठिकाणी पोहोचू शकली नाही. अपघातस्थळी गर्दी जमल्याने बचाव कार्यात अडथळे आले.
३० वर्षांत २७ अपघात-
नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.