Nepal Plane Crash: ‘त्या’ विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला; ३५ जणांच्या मृतदेहाची ओळख पटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:12 PM2023-01-17T13:12:04+5:302023-01-17T13:12:32+5:30
विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर), फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) यांच्या तपासणीनंतर या अपघातामागचे नेमके कारण कळू शकेल. चार बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू
काठमांडू : पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळचे विमान रविवारी कोसळून ६८ जण ठार झाले होते. त्यातील ३५ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या विमानाचा ब्लॅक बाॅक्स सापडला आहे. अपघातग्रस्त विमानातील चारजण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. या विमान दुर्घटनेमुळे नेपाळमध्ये सोमवारी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला.
विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर), फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) यांच्या तपासणीनंतर या अपघातामागचे नेमके कारण कळू शकेल. यती एअरलाइन्सच्या विमान दुर्घटनेत दगावलेल्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ती आपला अहवाल ४५ दिवसांच्या आत सादर करणार आहे.
बसऐवजी ‘ते’ चौघे विमानात बसले!
सोनू जयस्वाल, विशाल शर्मा, अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाह हे चार मित्र उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे रहिवासी होते. हे चौघेही पर्यटनस्थळ पोखरासाठी निघाले होते.
पशुपतीनाथाचे दर्शन घेतल्यानंतर चौघांनीही दिलीप वर्मा या आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला होता. पोखराला बसने जाणार आहोत, असेही त्यांनी दिलीपला सांगितले होते. “परंतु नंतर त्यांनी योजना बदलली आणि बसऐवजी विमानातून उड्डाण घेतले,” असे दिलीप वर्मा म्हणाले. अपघाताच्या काही क्षण आधी फेसबुक लाईव्ह करणारा सोनू जयस्वाल वाईन शॉप चालवत होता, असेही त्यांनी सांगितले. सोनूच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर दिलीप यांना जबर धक्का बसला आहे.
...म्हणून शेकडो जण वाचले
यती एअरलाइन्सचे विमान रविवारी पोखरा येथील जुन्या व नव्या विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटासारखा भयंकर मोठा आवाज झाला व त्यानंतर आसमंतात धूर पसरला, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. हे विमान घरांवर कोसळले असते, तर आणखी मोठी जीवितहानी झाली असती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. विमान कोसळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वेळाने बचावपथकेही घटनास्थळी पोहोचली.
‘ते’ विमान पूर्वी होते
किंगफिशर एअरलाइन्सचे नेपाळमध्ये कोसळलेले यती एअरलाइन्सचे विमान पूर्वी किंगफिशर एअरलाइन्सच्या मालकीचे होते, असे सिरियम फ्लिट्स डाटामधील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. आर्थिक घोटाळ्यातील फरारी आरोपी व उद्योजक विजय मल्ल्या हा किंगफिशर एअरलाइन्सचा मालक होता.