नेपाळचे पंतप्रधान येणार भारताच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 05:36 PM2017-08-08T17:36:46+5:302017-08-08T18:31:56+5:30
डोकलाम येथिल परिस्थितीमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत नेपाळचे पंतप्रधान देऊबा यांनी पदावरती पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काठमांडू, दि.8- नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा 23 ऑगस्टपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा पाच दिवसांचा असेल. पंतप्रधानपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा होत आहे. डोकलाम येथिल परिस्थितीमुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत नेपाळचे पंतप्रधान देऊबा यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
काठमांडू येथे दौऱ्याचा निर्णय जाहीर करताना नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री कृष्ण बहादूर महारा यांनी या दौऱ्याची तयारी सुरु असून त्यामधील कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे सांगितले. 24 ऑगस्ट रोजी देऊबा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतील त्याचप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही ते चर्चा करतील. त्यानंतर बोधगया आणि तिरुपती येथील बालाजी मंदिरासही ते भेट देतील. भारत आणि चीन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाबद्दल बोलताना महारा म्हणाले, भारत आणि चीन यांनी हा प्रश्न शांततापुर्ण चर्चेद्वारे सोडवावा. सीमाविषयक प्रश्नामध्ये कोणत्याही प्रकारे आम्हाला ओढले जाऊ नये.
बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांची शुक्रवारी काठमांडू येथे 15 वी बैठक होणार आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुरुवारी त्या बैठकीसाठी नेपाळमध्ये पोहोचतील. या बैठकीनंतर भारत भेटीवर विशेष चर्चा करता येईल असे सांगत महारा यांनी या दौऱ्यामधून काही ठोस गोष्टी निष्पन्न होतील यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. 14 ऑगस्ट रोजी चीनचे उपाध्यक्ष वॅंग यांग नेपाळला भेट देणार आहेत, त्यांच्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर नेपाळला जाण्याची शक्यता आहे. देऊबा यांच्या भारतभेटीमध्ये विविध विषयांवर द्वीपक्षीय चर्चा होणार असून महाकाली करार, नेपाळमधील पुनर्बांधणीबाबतचे करार, नेपाळमध्ये भारताने निधी दिलेले प्रकल्प, इतर सीमाविषयक करार यांचा त्यामध्ये समावेश आहे.
शेर बहादूर देऊबा
शेर बहादूर देऊबा यांचा जन्म 19 जून 1946 रोजी पश्चिम नेपाळच्या दादेलधुरा जिल्ह्यातील असिग्राम येथे झाला. ते सध्या नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. 1995-97, 2001-02, 2004-05 या कालावधीतही ते नेपाळचे पंतप्रधान होते. 7 जून 2017 रोजी ते नेपाळचे पुन्हा पंतप्रधान झाले. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांना एकदा कारागृहातही जावे लागले आहे.