चीनशी मैत्री नेपाळला पडतेय भारी, आता भंगाराच्या भावात विकावी लागतायत विमानं; काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:15 PM2023-10-14T13:15:06+5:302023-10-14T13:16:43+5:30
पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंकेला देशोधडीला लावल्यानंतर चीन गेल्या काही काळापासून नेपाळशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोणी चीनशी जवळीक साधतात ते देशोधडीला लागतातच अशी स्थिती आहे. यातच पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर आता नेपाळचेही वाईट दिवस सुरू झाले आहेत. चीननं त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आलीये.
नेपाळ एअरलाइन्सने काही वर्षांपूर्वी चीनकडून विमानांची खरेदी केली होती, ती सदोष निघाली आहेत. आता नेपाळ एअरलाइन्स ही विमानं भंगारात विकत आहेत. नेपाळ एअरलाइन्सने ही चिनी विमानं ६.६६ अब्ज नेपाळी रुपयांना (५० मिलयन डॉलर्स) खरेदी केली होती. नेपाळच्या काठमांडू पोस्ट या न्यूज पोर्टलनुसार अधिकाऱ्यांनी ही विमानं ग्राऊंडेड केल्याचं म्हटलं. जितकी त्यांची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त ती विमानं समस्या निर्माण करत आहेत.
२०१४-१८ दरम्यान विमानांची खरेदी
नेपाळनं २०१४ ते २०१८ दरम्यान चीनकडून एकूण सहा विमानं खरेदी केली होती. त्यापैकी एका विमानाचा अपघात झाला. तर उर्वरित पाच विमानं आता ग्राउंड करण्यात आली. यामध्ये दोन ५६ सीटर एमए६० आणि तीन १७ सीटर Y12E यांचा समावेश आहे. चिनी विमानांमध्ये सातत्यानं बिघाड होत आहे. उच्च देखभाल खर्चामुळे कर्जबाजारी नेपाळ एअरलाइन्सला ऑपरेट करणं खूप महाग झालंय. शिवाय, वैमानिकांची सततची कमतरता, परिणामी अपघात आणि अविश्वसनीयता यामुळे अधिकाऱ्यांना शक्य तितक्या लवकर विमानांना ग्राऊंडेड करण्यास भाग पडलंय. विमानं किमान तीन वर्षांपासून ग्राऊंडेड असून त्यांची उड्डाणंही झाली नाहीत. नेपाळ एअरलाइन्सनं आता ही विमानं केवळ २२० मिलियन नेपाळी रुपयांना (१.६५ मिलियन डॉलर्स) विक्रीसाठी ठेवली आहे.
अधिकाऱ्यांनी काय म्हटलं
नेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशनच्या एका उच्च पदस्थ सूत्रांनुसार, ही किंमत एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय कंपनीनं निश्चित केली आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कंपनीनं मूल्यांकन रिपोर्टसाठी २०००० डॉलर्स दिले. दरम्यान, हे स्क्रॅप मूल्य असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं. विमानं भाड्यानं देण्याचा प्रस्ताव अयशस्वी झाल्यानंतर ती विकण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढ्या कमी किमतीत महागडी विमाने विकण्याच्या विचारानं नेपाळ एअरलाइन्स संचालक मंडळ खूश नसल्याची माहित समोर आलीये.