नेपाळ भूकंपबळींची संख्या ७,७००
By admin | Published: May 7, 2015 01:13 AM2015-05-07T01:13:59+5:302015-05-07T01:16:50+5:30
विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.
काठमांडू : विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.
दोन हजार अभियंत्याचा ताफा भूकंपग्रस्त भागातील कोणतीही घरे राहण्यासाठी लायक आहेत, हे तपासण्याकामी लागले असून आतापर्यंत त्यांनी १३ हजार घरांची तपासणी केली आहे. यापैैकी ५० टक्के घरांची अवस्था राहण्यालायक असून २० ते २५ टक्के घरे मात्र राहण्यालायक नाहीत, तर उर्वरित घरांचां जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.
२५ एप्रिल रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ७,६५२ वर पोहोचली असून १६,३९० लोक जखमी झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिंधुपाल चौक जिल्ह्याला बसला. या जिल्ह्यात २,९३९ लोक मृत्यूमुखी पडले, तर काठमांडूत १,२०९ लोक मृत्यू पावले.
नेपाळचे राष्ट्रपती भवनही राहण्यास योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. ब्रिटीशकालीन या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. शीतल निवास नावाने राष्ट्रपती भवन ओळखले जाते. या इमारतीचा मागचा भाग सुरक्षित नसल्याचे नागरी \विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या तज्ज्ञांंनी घोषित केले आहे.
नेपाळने विदेशी मदत पथकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केल्याने भारतासह ३३ देशांचे मदत पथके परतीच्या मार्गावर आहेत. भारताच्या एनडीआरएफचे ८० जणांचे पथक नेपाळहून निघाले आहे. तसेच थायलँडचे २१ स्वयंसेवकही मायदेशी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)
----------
नेपाळी लष्कर आणि पोलिस भूकंपग्रस्त भागातील मदत कार्य हाती घेणार असून टप्प्याटप्प्यात विदेशी मदत पथके मायदेशी परततील, असे नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, बारापाक डोंगरी भागातील भूकंपग्रस्त लोकांपर्यंत अजुनही मदत पोहोचलेली नाही. तंबू आणि इतर आवश्यक वस्तुंसाठी त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. थंडी आणि पावसापासून बचाव करण्यासाठीही त्यांना सुरक्षित जागा नाही. लष्कराने हेलिकॉप्टरमधून मदत साहित्य पोहोचविले असले तरी ते पुरेसे नाही. मदत साहित्य अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. बारापाक भागातील लोक आता आपापल्या गावाच्या मदतीसाठी परतत आहेत.
ड्रोन विमानांना बंदी
नेपाळने आपल्या हवाई हद्दीत ड्रोन विमानांना बंदी घातली आहे. मानवरहित विमानांमुळे संवेदनशील माहिती उघड होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.