ओलींच्या 'रामायणा'वरून नेपाळमध्येच 'महाभारत', सोशल मीडियावर उमटताहेत अशा प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 07:48 AM2020-07-14T07:48:24+5:302020-07-14T07:54:33+5:30
ओली यांच्या या विधानानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर नेपाळमध्येही ओलींच्या या विधानावर चौफेर टीका होत असून, अनेक नेत्यांनी या विधानाचा विरोध केला आहे.
काठमांडू - गेल्या काही काळात कट्टर भारत विरोधी बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी काल भगवान श्री राम यांचे जन्मस्थान भारतातील अयोध्येत नसून, नेपाळमधील अयोध्येत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. ओली यांच्या या विधानानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर नेपाळमध्येही ओलींच्या या विधानावर चौफेर टीका होत असून, अनेक नेत्यांनी या विधानाचा विरोध केला आहे. भारत आणि नेपाळमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अशी विधाने करू नयेत, असा सल्ला दिला आहे.
नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टीचे सह-अध्यक्ष कमल थापा म्हणाले की, पंतप्रधानांनी अशी बिनबुडाची आणि कुठलाही पुरावा नसलेली विधाने करणे टाळले पाहिजे. पंतप्रधान ओली दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यापेक्षा नेपाळ आणि भारतामधील संबंध अजून बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रमको स्तरबाट यस्ता उटपट्यांग,अपुष्ट र अप्रमाणित कुरा आउनु सर्वथा उपयुक्त छैन।भारतसंग सम्बन्ध सुधार्ने भन्दा बिगार्ने तर्फ प्रमको ध्यान गए जस्तो लाग्छ।नक्सा प्रकाशित गरेर अतिक्रमित भूमी फिर्ताल्याउने प्रयास गर्न छाडेर दुई देशको सम्बन्धमा अनाबश्यक विवाद सिर्जना गर्नु राम्रो होईन https://t.co/jzP5hcH4qu
— Kamal Thapa (@KTnepal) July 13, 2020
तर नेपाळच्या राष्ट्रीय योजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष स्वर्णिम वागले यांनीही पंतप्रधानांनी केलेल्या या विधानावरून भारतीय प्रसारमाध्यने वादग्रस्त टिप्पण्या करू शकतात, असा इशारा दिला आहे.
हे राम !!
— Swarnim Waglé (@SwarnimWagle) July 13, 2020
भोलिको भारतीय समाचार: "Oli disavows Ayodhya's Ram, declares him to be Nepali from Birgunj"https://t.co/5yjwKznChp
नेपाळमधील सोशल मीडियासुद्धा पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केलेल्या विधानावरून ढवळून निघाला आहे. काहीनीं पंतप्रधानांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हे विधान विनोदी असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी मात्र पंतप्रधानांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, भारताविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या केपी शर्मा ओली यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचीसुद्धा मागणी झाली आहे. अशा परिस्थितीत ते आपले पद वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी तयार झाले आहेत. भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा दावादेखील ओली यांनी केला. आपल्याला पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याआधी ओली यांनी केला होता.