नेपाळचा आरोप प्रक्षोभक - भारत
By admin | Published: November 4, 2015 02:00 AM2015-11-04T02:00:16+5:302015-11-04T02:00:16+5:30
नेपाळने स्वीकारलेल्या नव्या घटनेच्या विरोधातील आंदोलनात भारत आमच्या देशात साध्या वेशातील सैनिक पाठवीत असल्याचा त्याचा आरोप भारताने तीव्र शब्दांत मंगळवारी फेटाळला.
काठमांडू : नेपाळने स्वीकारलेल्या नव्या घटनेच्या विरोधातील आंदोलनात भारत आमच्या देशात साध्या वेशातील सैनिक पाठवीत असल्याचा त्याचा आरोप भारताने तीव्र शब्दांत मंगळवारी फेटाळला. नेपाळचा हा आरोप ‘प्रक्षोभक’ आणि ‘वाईट हेतूंचा’ असल्याचे येथील भारतीय दूतावासाने म्हटले. नेपाळचे बिनखात्याचे मंत्री सत्य नारायण मंडल यांनी सोमवारी पूर्व नेपाळमधील बिरतनगर गावातील पत्रकार परिषदेत केलेल्या वरील आरोपाबद्दल दूतावासाने तीव्र शब्दांत काळजी व्यक्त केली. भारत नेपाळमध्ये साध्या वेशात सैनिक पाठवीत असल्याचा आरोप मंडल यांनी केला होता. भारत थेट लष्कर पाठवू शकत नाही म्हणून त्याचे सैनिक साध्या वेशात नेपाळमध्ये येण्याची शक्यता आहे, असा आरोप मंडल यांनी केला होता. मंडल यांचा हा आरोप निराधार, प्रक्षोभक आणि वाईट हेतूंचा आहे, असे दूतावासाने म्हटले. गेल्या सप्टेंबरमध्ये नेपाळने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष घटनेच्या विरोधात भारतीय वंशाच्या मधेसी समाजाने गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केले.