नेपाळमधील राजकीय पेच सुटेना; वरिष्ठ नेत्यांचे कसोशीने प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:15 PM2020-07-19T22:15:25+5:302020-07-19T22:15:48+5:30
सत्तारूढ पक्षाच्या स्थायी समितीची बैठक आता मंगळवारी
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यादरम्यान भागीदारीत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांचे कसोशीने प्रयत्न चालू असताना नेपाळच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीची बैठक सलग सातव्यांदा पुढे ढकलण्यात आली. रविवारी होणारी बैठक आता मंगळवारी सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आली आहे, असे कम्युनिस्ट पार्टी आॅफ नेपाळच्या (एनसीपी) केंद्रीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
स्थायी समितीचे सदस्य गणेश शाह यांनी सांगितले की, रविवारी होणारी बैठक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतभेद दूर करण्यासाठी आणखी दोन दिवस बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. सत्तारूढ पक्षाच्या स्थायी समितीची बैठक पहिल्यांदा २४ जून रोजी बोलाविण्यात आली होती. भारतातील तीन भागांचा नेपाळच्या नवीन नकाशात समावेश केल्याने पक्षाचे काही नेते शेजारच्या देशाशी संगनमत करून मला सत्तेतून हटवू पाहत आहेत, असा आरोप पहिली बैठक होण्याच्या आधी पंतप्रधान ओली यांनी केला होता. प्रचंड यांच्या गटाने ओली यांचा आरोप फेटाळून लावताना म्हटले की, ते नेते राजीनामा मागत आहेत.
भारत मागत नाही. ओली यांनी आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ पुरावा द्यावा, असे त्यांची म्हणणे आहे. माजी पंतप्रधान प्रचंड यांच्यासह सत्तारूढ पक्षाचे वरिष्ठ नेते ओली यांचा राजीनामा मागितला आहे. ओली यांनी अलीकडेच भारताविरुद्ध केलेली टिपणी राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या संयुक्तिक नव्हती, असेही या नेत्यांनी म्हटले
आहे.
तेव्हापासून वाढले मतभेद
एनसीपीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, राजीनाम्यासाठी ओली यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रचंड गटाने केंद्रीय कार्यकारिणीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे. रविवारी प्रचंड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेते माधव कुमार, झालाना खनाल, बामदेव गौतम यांनी राष्टÑीय संकटाच्या वेळी पक्षाचे सर्वसाधारण अधिवेशन बोलावणे उचित नसल्याचे मत व्यक्त केले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय ओली यांनी घेतल्यानंतर दोन्ही गटांत मतभेद वाढले आहेत.