नेताजी बोस सापडले होते विमान दुर्घटनेत
By Admin | Published: January 10, 2016 02:21 AM2016-01-10T02:21:07+5:302016-01-10T02:21:07+5:30
‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.
लंडन : ‘हिंदुस्थान जरूर आझाद होगा, उसको कोई गुलाम नही रख सकता’ हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात जखमी झाल्यानंतरचे शब्द होते, असा दावा एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर प्रकाश टाकणारी माहिती www. bosefiles. i»»ffo या ब्रिटिश वेबसाईटने दिली आहे. ही माहिती प्रत्यक्षदर्शी, तसेच ब्रिटिश गुप्तचर खात्याच्या अहवालावर आधारित असल्याचे या साईटने म्हटले आहे. नेताजी १८ आॅगस्ट १९४८ रोजी विमान अपघातात तैवान येथे मृत्युमुखी पडल्याचे आतापर्यंत सांगण्यात येत होते.
प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याच्या आधारे या साईटवर देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, या दिवशी बॉम्बफेक करणाऱ्या जपानी विमानाचा अपघात झाला होता. या विमानात नेताजी होते. व्हिएतनामच्या टुरान या विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर लगेच विमानात स्फोट होऊन त्याला आग लागली व धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर ते कोसळले. कर्नल हबीब उर रेहमान यांच्यासह नेताजी भाजलेल्या अवस्थेत विमानातून बाहेर आले. ते पेट्रोलच्या टाकीजवळ बसलेले असल्यामुळे त्यांना जास्त जखमा झाल्या असाव्यात असे या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती, असेही या वेबसाईटने म्हटले आहे.
भारतीयांना सांगा शेवटपर्यंत लढत होतो
बाहेर पडल्यानंतर झालेला संवाद रेहमान यांनी नोंदवल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला जास्त तर लागले नाही असे विचारपूस करून नेताजींनी रेहमान यांना सांगितले की, ज्या वेळी तुम्ही भारतात परत जाल, तेव्हा माझ्या भारतीय बांधवांना सांगा की मी शेवटच्या क्षणापर्यंत भारताच्या आझादीसाठी लढत होतो. आझादीसाठी युद्ध सुरू ठेवण्याचा आदेशही बोस यांनी रेहमान यांच्यामार्फ त दिला.
यानंतर बोस यांना गंभीर जखमी अवस्थेत नानमोन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काय झाले, हे १६ जानेवारी रोजी वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल असे सांगत या साईटने उत्कंठा ताणण्याचा खेळ केला आहे.