नेताजींचा मृत्यू झाला विमान अपघातातच
By admin | Published: September 9, 2016 04:38 AM2016-09-09T04:38:57+5:302016-09-09T04:38:57+5:30
दुसऱ्या महायुद्धात जपानचे बॉम्बफेकी विमान तैवानमध्ये कोसळून १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होरपळून मृत्यू
लंडन : दुसऱ्या महायुद्धात जपानचे बॉम्बफेकी विमान तैवानमध्ये कोसळून १८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होरपळून मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती असलेले जपान सरकारचे अधिकृत दस्तावेज येथील एका वेबसाइटने प्रसिद्ध केले आहेत.
‘बोसफाइल्स.इन्फो’ या वेबसाइटने जपान सरकारने अमेरिकेस १९४५ मध्ये पाठविलेला अंतरिम अहवाल ताज्या दस्तावेजांमध्ये आहे. मित्र राष्ट्रांच्या फौजांचे भारत आणि जपानी लष्कराच्या योकोहोमा डिव्हिजनने नेताजींच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांत हा अहवाल लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांना पाठविला. अंतिम अहवाल १९५६ मध्ये पाठविला होता. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, हे सिद्ध करण्यासाठी या वेबसाईटने बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. (वृत्तसंस्था)
नेताजी बोस यांना घेऊन तौरेन (आताचे दा नांग) येथून निघालेले जपानी लष्कराचे बॉम्बफेकी विमान १८ आॅगस्ट १९४५ रोजी तैहोकू विमानतळावर पोहोचले.
इंधन भरून विमानाने पुन्हा उड्डाण केले. जेमतेम १० मीटर उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूच्या इंजिनाचा प्रॉपेलर निखळून खाली पडल्याने विमान जोरात हेलहावे खाऊ लागले. विमानतळाच्या टोकावरील टेकाडावर आदळून विमानाच्या दोन्ही बाजूस आग लागली.
इंधनाने माखलेले व आगीने लपेटलेले नेताजी विमानातून बाहेर आले व सरपटत पुढच्या बाजूस गेले. त्यांचे मदतनीस हबीब-उर-रहमान हेही खुरडत बाहेर पडले व त्यांनी नेताजींच्या कपड्यांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.
नेताजींच्या मानेवर दोन-तीन ठिकाणी कापले होते. नेताजींना तैहोकू येथील लष्करी इस्तितळात नेऊन दु. ३वाजता उपचार सुरू झाले.
मात्र रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. २० आॅगस्ट रोजी त्यांचे पार्थिव शवपेटिकेत ठेवण्यात आले. २२ आॅगस्टला ‘अंत्यविधी’ झाले व २३ आॅगस्ट रोजी तैहोकू येथील निशी होन्गांजी बौद्ध मंदिरात त्यांचे दफन करण्यात आले.