तैवानमधील विमान अपघातामुळे नेताजींचा मृत्यू
By admin | Published: January 17, 2016 02:03 AM2016-01-17T02:03:22+5:302016-01-17T02:03:22+5:30
तैवानमध्ये झालेल्या एका विमान अपघातात जखमी होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा हवाला देऊन एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.
लंडन : तैवानमध्ये झालेल्या एका विमान अपघातात जखमी होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा हवाला देऊन एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे.
‘डब्ल्यू डॉट डब्ल्यू डॉट डब्ल्यू बोस फाईल्स डॉट इंफो’ ही ब्रिटिश वेबसाईट नेताजींचे रहस्यमय बेपत्ता होण्यामागचे कारण शोधून काढण्याचे प्रयत्न करीत आहे.
१८ आॅगस्ट १९४५ रोजी तैवानची राजधानी तैपेयीच्या विमानतळाबाहेरील बाजूला झालेल्या विमान अपघातात ‘इंडियन नॅशनल आर्मी’च्या या संस्थापकाचा मृत्यू झाला, असे पाच साक्षीदारांचा हवाला देऊन वेबसाईटने म्हटले आहे.
या पाच साक्षीदारांत नेताजींचा एक निकटचा सहकारी, दोन जपानी डॉक्टर, एक दुभाषी आणि एक तैवानी नर्स यांचा समावेश आहे.
बोस त्यांचे एक सहायक कर्नल हबीबूर रहमान यांना ‘मृत्यूपूर्वी म्हणाले की, ‘त्यांचा (बोस यांचा) अंत समीप असून, मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढलो आणि प्रयत्नातून मी बलिदान देत आहे’, असा संदेश देशवासीयांना द्या. जपानी सदर्न आर्मीचे ‘चीफ आॅफ स्टाफ’कडून हिकारी किकानला पाठविण्यात आलेल्या एका टेलिग्रामचीही प्रत मिळाली होती. जपान सरकार आणि बोस यांचे ‘अंतरिम स्वतंत्रता भारत सरकार’ यांच्यात हिकारी किकान एक संपर्क सेतू म्हणून काम करीत होती. २० आॅगस्ट १९४५ च्या या केबलमध्ये बोस यांच्यासाठी ‘टी’ शब्दाचा वापर करून म्हटले आहे की, १८ तारखेला ‘टी’ राजधानी टोक्योला परतत असताना ताईहोकू (तैपेयीचे जपानी नाव) येथे विमान अपघातात गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी रात्रीच त्यांचा मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
मे-जुलै १९४६ मध्ये ब्रिटिश लष्करातील लेफ्टनंट कर्नल जे.जी. फिग्गेस यांनी या अपघाताबाबत जपानी डॉक्टर तोयोशी सुरुनासह सहा जपानी अधिकाऱ्यांसोबत विचारपूस केली होती. त्यावेळी सुरुना दुर्घटना स्थळापासून जवळच असलेल्या नानमोन लष्करी इस्पितळात होते. याच इस्पितळात बोस यांना आणण्यात आले होते.
डॉ. सुरुना यांनी फिग्गेस यांना सांगितले की, आपण रात्रभर माझ्याजवळ बसून राहाल काय, अशी विचारणा बोस यांनी माझ्याकडे केली होती, पण सायंकाळी ७ नंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडत गेली. डॉक्टरांनी त्यांना पुन्हा एकदा इंजेक्शन दिले, पण ते कोमात गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.