युद्धादरम्यान नेतन्याहू अचानक गाझात पोहोचले; ओलिसांच्या सुटकेसाठी दिली 38 कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 06:23 PM2024-11-20T18:23:05+5:302024-11-20T18:23:57+5:30

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

Netanyahu suddenly arrived in Gaza during the war; An offer of 38 crores was made for the release of the hostages | युद्धादरम्यान नेतन्याहू अचानक गाझात पोहोचले; ओलिसांच्या सुटकेसाठी दिली 38 कोटींची ऑफर

युद्धादरम्यान नेतन्याहू अचानक गाझात पोहोचले; ओलिसांच्या सुटकेसाठी दिली 38 कोटींची ऑफर


Israel and Hamas War:इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. या दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचे संरक्षण मंत्री इस्रायल कौट्स यांच्यासोबत गाझाला भेट दिली. दोघेही गाझा येथील अज्ञात ठिकाणी पोहोचले. त्यांनी ओलीसांची सुटका करून या भागातून बाहेर काढण्यासाठी पॅलेस्टिनींना आर्थिक बक्षीस जाहीर केले आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्येक ओलीसासाठी 5 मिलियन डॉलर्स (सुमारे 38 कोटी रुपये) बक्षीस देण्याचे वचन दिले आहे. ते म्हणाले, "ज्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे आहे, त्यांनाही मी सांगतो, जो कोणी बंधकांची सुटका करेल, त्याच्या कुटुंबीयांना या भागातून सुरक्षितरित्या बाहेर काढले जाईल." 

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1200 लोकांना ठार केले होते, तर 250 लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांपैकी काहींना दोन लहान युद्धविरामांतर्गत सशर्त मुक्त करण्यात आले, परंतु अनेक हल्ल्यांमध्ये मारले गेले. जवळपास 100 ओलीस अजूनही हमासच्या कैदेत आहेत. त्यांची सुटका व्हावी यासाठी सातत्याने निदर्शने केली जात आहेत. 

हजारो पॅलेस्टिनी ठार
इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सुमारे 44 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. हे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. हा नरसंहार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. दुसरीकडे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धही सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 3400 लोक मारले गेले आहेत.

ताज्या हल्ल्यात इस्रायली लष्कराने मध्य बेरूतला दोन क्षेपणास्त्रे डागली, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले. लेबनीजच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण लेबनीज सरकारच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे. दुसरा हल्ला पश्चिम आशियातील इमारतीजवळ झाला, जेथे संयुक्त राष्ट्रांचे सामाजिक आणि आर्थिक आयोग आहे.

Web Title: Netanyahu suddenly arrived in Gaza during the war; An offer of 38 crores was made for the release of the hostages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.