भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:29 AM2021-05-20T09:29:28+5:302021-05-20T09:33:26+5:30
Coronavirus In India : भारतात आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णसंख्येत १३ टक्क्यांची घट. जागतिक आरोग्य संघटनेनुसार यानंतरही संसर्गाचं प्रमाण जगात सर्वाधिक.
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. सध्या देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या आता कमी होताना दिसत आहे. भारतात गेल्या एका आठवड्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. परंतु संसर्गाची नवीन प्रकरणे अद्यापही भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
जगभरात ज्या ठिकाणी ४८ लाखांपेक्षा थोडे अधिक नवे रुग्ण समोर आलेत आणि मृत्यूंची संख्याही ८६ हजारांपेक्षा थोडी कमी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १२ टक्के आणि पाच प्रतितास इतकं आहे. सर्वाधिक प्रकरणं ही भारतातून समोर आली आहे. परंतु गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये १३ टक्क्यांची घट झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यानंतर ब्राझिलमधून सर्वाधिक प्रकरणं समोर आली असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली, तर अमेरिकेतील नव्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांची घसरण तर अर्जेंटिनातील नव्या प्रकरणांमध्ये ८ टक्क्यांची आणि कोलंबियातील प्रकरणांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
मृतांच्या आकडेवारीतही भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. भारतात नव्या २७,९२२ नोंदी झाल्या. प्रति एक लाख लोकांमागे नव्या दोन लोकांचा मृत्यू होत असून हे प्रमाण चार टक्के इतकं असल्याचं समोर आलं आहे. यानंतर नेपाळ आणि इंडोनेशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. तरी दुसरीकडे इंडोनेशियामध्ये हे प्रमाण पाच टक्क्यांनी घटलं आहे.
भारतात सर्वाधिक नव्या प्रकरणांची नोंद
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे राष्ट्रीय अधिकाऱ्यांकडे ९ मे पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक २७,३८,९५७ नव्या प्रकरणांची नोंद झाली. ही त्या पूर्वीच्या आठवड्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. WHO च्या अंदाजानुसार भारतात कोरोनाची एकूण प्रकरणं २.४६ कोटी आहेत आणि एकूण मृत्यूंची संख्या २,७०,२८४ इतकी आहे.