New Corona Virus : मलेशियात आढळला नवा कोरोना, कुत्र्यांपासून माणसाला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:20 AM2021-05-26T10:20:16+5:302021-05-26T10:21:28+5:30
New Corona Virus : कुत्र्यांपासून तयार झालेला या व्हायरसची लागणही अनेकांना झाल्याचा दावा मलेशियन वैज्ञानिकांनी केला आहे. या व्हायरसची खात्री झाल्यास पशूंमधून मानवात आलेला हा आठवा व्हायरस ठरेल
कोरोनाची पहिली लाट संपुष्टात येतेय न येतेय तोवर दुसऱ्या लाटेनं आक्रमण केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील अर्थव्यवस्था आणि आरोग्यव्यवस्था कोलमडली. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन आणि रुग्णांसाठी सुविधा न मिळाल्याने सर्वसामान्यांची मोठी वाताहात झाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली असतानाच म्युकरमायकोसिस या नव्या रोगाने भीती निर्माण केली आहे. तर, मलेशियात कोरोनाच्या आणखी एका व्हायरसचा शोध लागला आहे. कुत्र्यांपासून हा कोरोना व्हायरस निर्माण झाल्याचे येथील वैज्ञानिकांनी म्हटलंय.
कुत्र्यांपासून तयार झालेला या व्हायरसची लागणही अनेकांना झाल्याचा दावा मलेशियन वैज्ञानिकांनी केला आहे. या व्हायरसची खात्री झाल्यास पशूंमधून मानवात आलेला हा आठवा व्हायरस ठरेल. तसेच, कुत्र्यांपासून पसरणारा पहिलाच व्हायरस असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 20 वर्षांपासून व्हायरसवर काम करणाऱ्या महामारी विशेषज्ञ डॉ. ग्रेगरी ग्रे यांनी आपल्या एका विद्यार्थ्यास कोरोना व्हायरसच्या तपासणीसह इतरही तपासणी किट बनविण्यास सांगितले आहे.
ग्रेगरी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एका विशिष्ट टेस्ट किटची निर्मित्ती केली आहे. या किटद्वारे कोरोना व्हायरसच्या इतर व्हायरसची तपासणी केली जाऊ शकते. या टूलच्या सहाय्याने गतवर्षी काही नमुन्यांची तपासणी केली असता, कुत्र्यांशी संबंधित लिंकचा खुलासा झाला. मलेशियातील सारवेक येथील रुग्णालयातील एका रुग्णाचे हे नमुने होते. या रुग्णांना 2017 ते 2018 पासून निमोनियासारखे लक्षणं होते.
या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. ग्रेगरी यांच्या टीमने तपासणी केलेल्या 301 पैकी 8 नमुने हे कुत्र्यांपासून आलेल्या कोरोना व्हायरसने संक्रमित होते. या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. सध्या, या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी, अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीची प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट अनस्तसिया व्लासोवा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
संक्रमणाचा धोका नाही
कुत्र्यांपासून संसर्ग झालेल्या या कोरोना व्हायरसचे सर्वच रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, माणसांमधून माणसांमध्ये या व्हायरसाच संसर्ग झाल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही. त्यामुळे, कुत्र्यांपासून आलेल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका नसल्याचे अनस्तसिया व्लासोवा यांनी म्हटलं आहे.