CoronaVirus: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर?; ३९ जणांना बाधा झाल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 02:05 PM2020-04-06T14:05:58+5:302020-04-06T14:06:22+5:30
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली
वुहान: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून रुग्ण आणि मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं युरोपियन देशांमध्ये हजारोंचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेत थैमान घातलं आहे. कोरोना युरोप आणि अमेरिकेत कित्येकांसाठी जीवघेणा ठरत असताना चीनमधील परिस्थिती सुधारली. चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळू शकतो. काल चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळून आले. हे सगळे जण परदेशांमधून चीनला परतल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व संबंधित यंत्रणा अलर्टवर असल्याची माहिती चीनमधील अधिकाऱ्यानं दिली. परदेशात गेलेले चिनी नागरिक मायदेशी परतत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं आज दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे एकूण ३९ रुग्ण आढळले असून यातील ३८ जण परदेशातून आलेले आहेत. तर एक व्यक्ती स्थानिक आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर तिथे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्चच्या अखेरपर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे ३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यानंतर हळूहळू चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. याचवेळी संपूर्ण जगभरात कोरोना अतिशय वेगानं पसरत होता. आत्ताही जगातील कित्येक देशांसमोर कोरोनानं मोठं आव्हान उभं केलंय.
चीनमधून पुन्हा एकदा कोरोना थैमान घालू शकतो अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. जगभरात अडकलेल्या चिनी नागरिकांना मायदेशी आणण्याचं चीननं सुरू केलं आहे. परदेशातून चीनमध्ये परतणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वैद्यकीय अहवालांमधून समोर आलं आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.