पाकच्या नव्या सरकारनेही जाधव यांच्याविरोधात ओकली गरळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:04 PM2018-08-23T17:04:41+5:302018-08-23T17:13:38+5:30
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या कुलभूषण जाधव यांच्या विरोधात नव्या सरकारनेही गरळ ओकली आहे. जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पक्के पुरावे असल्याचे नवे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात सुरु असलेला खटला आपणच जिंकणार असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली आहे.
कुलभूषण जाधव यांना एप्रिल, 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या खटल्याचा निकाल पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी युक्तीवाद केला आहे.
कुरेशी यांनी मुल्तानच्या प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाधव यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आपलाच विजय होणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले होते. जाधव हे इराणमार्गे पाकिस्तानात घुसखोरी करत होते, असा दावा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाककडून असा युक्तीवाद करण्यात आला आहे की, कुलभूषण जाधव हे काही साधारण व्यक्ती नसून ते भारताचे हेर आहेत. ते पाकमध्ये काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने येत होते. या पाकच्या आरोपांना भारताने फेटाळले होते. पाकने जाधव यांचे इराणमध्ये अपहरण केले होते. जाधव हे नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ते आपला व्यवसाय करण्यासाठी इराणमध्ये गेले होते. मात्र, सरकारशी त्यांचा काही संबंध नव्हता.